आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठं कुठं जायाचं फिरायला:पावसाळी पर्यटनाचा बेत आखत असाल, तर या ठिकाणी आवर्जुन भेट द्या...!

हर्षदा हरसोळे। औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभर पावसाने लावललेली दमदार हजेरी. हिरव्यागार झालेल्या डोंगर कपाऱ्या. ओसंडून वाहणारे धबधबे. हे सारे पाहिले की, भटक्यांना पर्यटनस्थळे बोलावतात. त्यांची पावले आपुसकच गडकोटापासून ते नयनरम्य ठिकाणांकडे वळतात. चला तर मग जाणून घेऊया महाराष्ट्रातील अशीच काही पर्यटनस्थळे. जिथे आपला वीकेंड मजेत जाईल.

पर्यटकांना बोलावणारा महाराष्ट्रातील महत्त्वाचा जिल्हा म्हणजे औरंगाबाद. इथला बीबी-का-मकबरा, दौलताबादचा किल्ला, वेरूळ लेणी आणि जवळचे अजिंठा आवर्जुन पाहा. येथे आलात, तर भरभरून आनंद सोबत न्याल.

1. दौलताबाद

दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव देवगिरी हे होते. हा किल्ला यादव वंशाच्या काळामध्ये बांधला गेला. या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावर अनेक राजांनी राज्य केले. परंतु युद्ध करून, सैनिक बळावर तो कोणालाच जिंकता आला नाही. हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य राहिला.

2. महेशमाळ

औरंगाबादपासून अवघ्या 36 किलोमीटरवर असलेले महेशमाळ म्हणजे निसर्ग आणि ऐतिहासिक वास्तूंचा सुंदर मिलाफ. वनस्पतिशास्त्राची येथे जणू प्रयोगशाळाच वसलेली आहे. तुम्हाला येथे विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांचे प्रकार पाहायाला मिळतील. पावसाळा अन् हिवाळ्यात तर जणू स्वर्गच धरतीवर उतरल्याचा अनुभव येतो. मान्सूनमध्ये तर येथील डोंगर- दऱ्यांमध्ये पसरलेला हिरवा गालिचा अन् पायाशी लोळणारे ढग डोळ्यांचे पारणे फेडतात.

मिनी महाबळेश्वर

महेशमाळ सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडचा भाग आहे. या परिसराला सुंदर, विलक्षण पर्वतरांग लाभलेली आहे. मराठवाड्यातील हे मिनी महाबळेश्वर एका उंच पठारावर चहूकडे पसरलेले आहे. या पठारामधून जाणारी डांबरी सडक पठार विभागून उत्तरेकडच्या टोकापर्यंत जाते. पावसाळ्यात अधून-मधून सतत कोसळणाऱ्या मुसळधार, रिमझिम पावसाच्या सरी, हिरव्यागार खोल दऱ्या, प्रसन्न करणारी हवा, मनमोहक व्ह्यू- पॉइंट, घनदाट झाडी, जागोजागी चढ-उतारांच्या पाऊलवाटा... त्यातच मधोमध असलेला गिरजा तलाव, हे चित्र डोळ्याचे पारणे फेडते. येथील व्ह्यू- पॉइंटवरून जवळजवळ 30 किलोमीटर इतका दिसणारा आसमंत एखाद्या चित्रासारखा भासतो. दऱ्या - खोऱ्यातील रेखीव शेती, मध्ये असलेली छोटी घरे, जागोजागी दिसणारे जंगलांचे पुंजके आपल्या मनात घर करून जातात. येथील समशीतोष्ण हवामान आपल्याला हवेहवेचे वाटते. आकडेवारीनुसार येथील तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, तर किमान तापमान साधारणपणे ७ अंश सेल्सिअसपर्यंत जाते. त्यामुळे वर्षभरात कधीही यावे, असे हे पर्यटनस्थळ आहे.

3. गौताळा

गौताळा अभयारण्य सह्याद्रीच्या सातमाळा आणि अजिंठा पर्वत रांगांमध्ये आहे. गौताळा अभयारण्य भारत सरकारने 1986 मध्ये स्थापन केले. राज्यातील निवडक विशेष अभयारण्य आणि पर्यटन स्थळांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. पश्चिम घाटाच्या दक्षिणेकडील उष्णकटिबंधीय कोरडे पानझडी जंगले, वनस्पती आणि प्राण्यांच्या असंख्य प्रजाती अशी याची ओळख आहे. भारतातील निवडक आकर्षक वन्यजीव अभयारण्यांमध्ये गौताळा याचा उल्लेख केला आहे.

4. लोणावळा / खंडाळा

मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. इथे असलेली विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दर्‍या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारे काही मनाला खूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुक्याच्या वातावरणात हरवून जाण्यात खूपच मजा वाटते. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपास पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यात राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर ही त्यापैकी काही ठळक ठिकाणे आहेत. लोणावळ्याची चिक्की तर सर्वदूर प्रसिद्ध आहे.

5. सिंहगड

पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा सिंहगड. हा किल्ला हवेली तालुक्यातील डोणजे गावात आहे. तो पुणे शहरापासून 35-40 कि.मी. अंतरावर असून 1290 मी. उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महराजांचे विश्वासू व शूर सरदार तानाजी मालुसरे यांचे याच ठिकाणी मुघल सत्तेशी युध्द झाले.

6. ताम्हिणी घाट

मुंबई - गोवा महामार्गावर मुंबईपासून 140 कि.मी वर असणारा हा घाट अनेकांचे पावसाळ्यातील आवडते ठिकाण. जर तुम्हाला निसर्ग आणि साहसी पर्यटन हे दोन्ही आवडतं.. तर इथे तुम्ही जायलाच हवं. येथील खोल हिरव्या दऱ्या, मुळशी धरण, कडेलोटावरुन पडणारे छोटेमोठे धबधबे तुम्हाला आकर्षित करतील. आणि सोबतीला जवळच 30 कि. मी वर सिंहगड किल्ला आहे. तेव्हा एकदा इथे नक्की भेट द्या.

7. माथेरान

माथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण 2600 फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील सदाहरीत जंगलात विविध प्रकारची वृक्षसंपदा आणि प्राणीजीवन आढळते. शार्लोट लेक, पॅनारोमा पॉईंट, लुईझा पॉईंट, सनसेट पॉईंट, वन ट्री हिल अशी अनेक पॉइंट इथे मनाला भुरळ घालतात. माथेरानमध्ये राहण्यासाठी चांगले हॉटेल आहेत.

8. भंडारदरा

निसर्गाचे सान्निध्य जवळून अनुभवायचे असेल तर भंडारदरा सर्वोत्तम ठिकाण आहे. नाशिकपासून फक्त 70 किलोमीटरवर वसलेले भंडारदरा. पावसाळ्यात तर हे ठिकाण निसर्गप्रेमींना अक्षरशः भुरळ घालते. इथल्या डोंगरदऱ्या, धबधबे, जलाशय, ओहोळ, धरणाच्या आजूबाजूचा भाग, वनसंपदा, प्राणी आणि पक्षी पाहण्यासाठी यंदा भंडारदऱ्याला जरूर जा.

9. अमृतेश्वर मंदिर रतनगड

भंडारदरापासून काही किलोमीटरवर असलेल्या रतनवाडीत श्री अमृतेश्वर मंदिर आहे. हे मंदिर जवळजवळ 1200 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. हेमांडपथी शंकराचे हे मंदिर जितके प्राचीन आहे तितकेच सुंदर आहे. या मंदिराशेजारी जुन्या बांधणीची विहीर आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात या मंदिरातील शिवलिंग संपूर्णपणे पाण्याखाली जाते. मंदिरातील फक्त गाभाऱ्यात जमा होणारे हे पाणी म्हणजे निसर्गाची एक अद्भुत किमया आहे. या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रतनवाडी पर्यंत जलाशयातून बोटीनेदेखील जाता येते.

10. सांदन व्हॅली

डोंगरकपारीतली सांदन व्हॅली म्हणजे निसर्गाचा देखणा चमत्कार आहे. येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एकतर तुम्ही शेंडी आणि घाटघर करत साम्रद गावात पोहचू शकता. अथवा तुम्हाला रतनवाडी मार्गे सांम्रद गावात पोहचावे लागेल. साम्रद गावात पोहचल्यावर एखाद्या वाटाड्याच्या मदतीने तुम्ही सांदण दरीत जाऊ शकता. पावसाळ्यात ही दरी पाहण्यासाठी गावागावातून पर्यटक येतात. धुक्याच्या दरीत लोटलेल्या गावात केवळ एखादा जाणकार वाटाड्याच तुम्हाला सांदन व्हॅलीत नेऊ शकतो. सांदन व्हॅलीत खाली उतरण्यासाठी एक अंरूद वाट आहे. या दरीत खाली उतरल्यावर निसर्गाचे लोभस दृश्य पाहून तुमची तहान भूक नक्कीच हरपेल

बातम्या आणखी आहेत...