आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Eknath Shinde Aurnagabad Meeting | In Aurangabad, The Migration Of The Uddhav Group Has Stopped Because There Is No Guarantee, 'Bhav'' For The Shinde Group | Marathi News

गटबदल:औरंगाबादेत सध्या शिंदेगटाला हमी, ‘भाव’ नसल्याने थांबले उद्धव गटाचे स्थलांतर, आदित्य यांच्या दौऱ्यानंतर सहानुभूती

औरंगाबाद / श्रीकांत सराफ5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३१ जुलै रोजी औरंगाबादेत येतील. तेव्हा शहरातील उद्धव गटाचे किमान ५० स्थानिक पदाधिकारी, महत्त्वाचे कार्यकर्ते शिंदे गटात जातील, असे म्हटले जात होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. यामागे नेमकी काय कारणे आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिव्य मराठी प्रतिनिधीने केला. तेव्हा शिंदे गटाविषयी हमी आणि त्या गटात गेल्यावर फायद्याचा भाव नसल्याने स्थलांतर तूर्तास थांबल्याचे समोर आले. गटबदल टाळण्याची सात कारणेही सांगण्यात आली.

आठ दिवसांत चमत्कार होणार असे आमदार प्रदीप जैस्वाल यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात म्हटले होते. जैस्वाल, शिरसाट, भुमरे यांनी काही जणांशी संपर्क साधून प्रवेश सोहळ्याची तयारीही केली होती. पण सोहळा झालाच नाही. त्यामागील कारणे जाणून घेण्यासाठी दिव्य मराठीने शहरप्रमुख संतोष जेजूरकर, बाळासाहेब थोरात, औरंगाबाद पूर्व मतदारसंघ संघटक राजू वैद्य यांच्यासह काही शाखाप्रमुख, शिवसैनिकांशी संवाद साधला. तेव्हा स्थलांतराला ब्रेक लागण्याचे एक प्रमुख कारण सांगितले. ते म्हणाले की, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर लोकांमध्ये सहानुभूती प्रचंड वाढल्याचे आमचा व्यक्तिगत अभ्यास सांगत आहे.

शिवाय शिंदे गट किती टिकेल याची सध्या हमी नाही. तरीही त्या गटात गेलो तर अस्तित्व सिद्ध करण्यासाठी पुन्हा लढावे लागेल. त्यापेक्षा आहे त्या ठिकाणी राहिलो तर किमान भाव (मानसन्मान) मिळेलच. तर शिंदे गटाने आम्ही शिवसैनिकच, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे शिवसेना एकसंघ राहणार असेल तर गटबदल कशासाठी, असा प्रश्न स्थानिक पदाधिकाऱ्यांपुढे आहे, असे ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेतील घडामोडींचे अभ्यासक डाॅ. अनिल फळे यांनी सांगितले. आमदार जैस्वाल म्हणाले की, ३१ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवेश सोहळा झाला नाही. तो लवकरच मुंबईत होईल.

तीन पदाधिकाऱ्यांसह काही शाखाप्रमुखांच्या मते काँग्रेस-राष्ट्रवादीशी युतीचा फायदा होईलच
1] आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर हिंदुत्ववादी मतदार पुन्हा उद्धव गटाकडे मोठ्या संख्येने वळले.
2] भाजपनेच शिवसेनेला धोका दिल्याची भावना वाढत आहे.
3] कट्टर हिंदुत्ववादी मते कमी झाली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीची मते उद्धव ठाकरे गटाला मिळतीलच.
4] आमदार जैस्वाल, शिरसाटांविषयी मतदारांमध्ये नाराजी आहे.
5] ठाकरेंशी निष्ठा ठेवल्याचे फळ मिळेल.
6] गट बदलल्याने सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल.
7] ठाकरे सेनेत राहूनच लोकसेवा करणे सोपे आहे.

बातम्या आणखी आहेत...