आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकृषी दिनानिमित्ताने १ जुलैला नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र’चा पहिला संकल्प जाहीर केला. तीन आठवडे उलटूनही दोन मंत्र्यांच्या सरकारची मंत्रिमंडळ स्थापनेसाठीची कसरत सुरूच आहे. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही २३ दिवसांत राज्यात तब्बल ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. यात औरंगाबाद, बीड, यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. पण याची दखल घेऊन ज्यांनी यावर उपाययोजना कराव्यात ते कृषिमंत्रीच मुख्यमंत्री शिंदेनी नियुक्त केलेले नाहीत. उलट, गेल्या २० दिवसांत त्यांनी दोन वेळा दिल्ली गाठली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील दोन खांबी मंत्रिमंडळाच्या आजवर तीन कॅबिनेट बैठका झाल्या. त्यात सरपंचांची निवड थेट जनतेतून, आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांना पेन्शनचे निर्णय झाले. जिल्हा तसेच विमानतळांच्या नामकरणापासून एमएमआरडीएच्या कर्जाच्या हमीची घोषणा झाली. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, कृषीच्या कोलमडलेल्या अर्थकारणात मूलभूत बदल होईल, असा दिलासादायक निर्णय घेण्यात आला नाही.
विदर्भातील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये पाहणी करताना दीड लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे जाहीर करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसान भरपाईचा पुनर्विचार करण्याची घोषणा केली. मात्र राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असा आश्वासक निर्णय एकही झालेला नाही.
‘बळीराजा चेतना’ विझलेलीच, वसंतराव मिशनही संपुष्टात
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत महाराष्ट्र शासनाने बळीराजा चेतना अभियान, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन स्थापन केले होते. सध्या हे दोन्ही उपक्रम बासनात गुंडाळले आहेत. जानेवारी ते जून या ६ महिन्यांत मराठवाड्यात ३०६, तर विदर्भात ३६८ आत्महत्या झाल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा अधिक आहे. त्या मंत्रिमंडळातही शिंदे मंत्री होतेच. त्यामुळे त्यांच्या घोषणाने निर्माण झालेली आशा प्रत्यक्षात निर्णयाअभावी अधांतरी राहिली आहे.
केवळ घोषणा निरर्थक
बियाणे, खते, औषधे यामुळे अवाढव्य वाढलेला लागवड खर्च, बिनभरवशाचे बाजारभाव, हातात भांडवलाची कमी आणि वाढणारे नुकसान हे चार प्रश्न शेतीच्या मुळाशी आहेत हे राजकारणीही जाणतात. परंतु, या मूलभूत प्रश्नांवर उपाययोजना करणारे निर्णय घेतल्याशिवाय केवळ घोषणा व संकल्प निरर्थक आहेत.'
- किशोर तिवारी, माजी अध्यक्ष, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन
कोणत्या जिल्ह्यात किती आत्महत्या?
औरंगाबाद 15
बीड 13
यवतमाळ 12
अहमदनगर 7
परभणी 6
जळगाव 6
जालना 5
बुलडाणा 5
उस्मानाबाद 5
अमरावती 4
वाशिम 4
अकोला 3
नांदेड 2
भंडारा-चंद्रपूर 2
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.