आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निराधारांना आधार:नांदेडमध्ये भुकेल्यांना पोटभर अन्न, निराधारांना आधार देणारी तरुणाई

नांदेड / शरद काटकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेघरांना वृद्धाश्रमापर्यंत पोहोचवण्यासह अन्नदान करताहेत पाच तरुण

नांदेड शहरातील काही भागांमध्ये अनेक निराधार रस्त्यावर राहतात. यात मनोरुग्णांची संख्याही जास्त आहे. त्यांच्याकडे क्वचितच कुणी लक्ष देत असतील. परतु, बीए प्रथम वर्षात शिकणारा दीपक बालाजी पवार व त्याचे चार मित्र सहा महिन्यांपासून या सर्वांचे आधार ठरले आहेत. निराधारांची दाढी-कटिंग करणे व त्यांच्यापर्यंत अन्न पोहोचवण्यासह वृद्धाश्रमात त्यांच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी हे सर्व जण अविरत धडपडत आहेत.

दीपकसह महेश तेलंग, नीरज मुदिराज, संतोष मेटकर, प्रथमेश कांबळे हे सर्वजण रोज रात्री मंगल कार्यालय, हॉटेल व अन्य कार्यक्रमातील उरलेले अन्न एकत्र करतात व भुकेल्यापर्यंत पोहोचवतात. मनोरुग्णांची स्वच्छता, बेघरांना वृद्धाश्रमापर्यंत पोहोचवण्याचे कामही या तरुणांनी हाती घेतले आहे. बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसर, असाना टी पॉइंट, नगिना घाट, हिंगोली गेट आदी ठिकाणी बेघर, मनोरुग्ण, अंध, दिव्यांगाची संख्या मोठी आहे. यात काही जणांना घर असूनही केवळ मुलांशी जमत नसल्याने त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे, तर काही जण परजिल्हा, परराज्यातूनही येथे चुकून आले आहेत. बऱ्याच जणांना आपण कुठून आलो हेच माहिती नाही. वृद्धाश्रमात सोडा, पण घरी नको, असेही म्हणणारे असल्याचे दीपकने सांगितले.

बेघरांची दाढी-कटिंग स्वत:च करतात : सर्व तरुण या निराधारांची कटिंग-दाढी करून त्यांना अंघोळ घालणे. याशिवाय त्यांना चांगले कपडे घालून त्यांच्या मर्जीनुसार वृद्धाश्रमात सोडतात. अशाच एका व्यक्तीला औरंगाबाद येथे सुखरूप वृद्धाश्रमात नेऊन सोडल्याचे दीपकने सांगितले. मंगल कार्यालय, कार्यक्रमांमधून अन्न मिळाले नाही तर प्रसंगी दीपकच्या घरूनही निराधारांना जेवण दिले जाते.

दृष्टिहीन अशाेक यांना साेडले छत्तीसगडच्या आश्रमात
दृष्टिहीन अशोक प्रदीप जाधव (५५) हे मूळचे पुण्यातील रहिवासी. चार वर्षांपासून ते नांदेडमध्ये बंदाघाट परिसरात राहतात. ते एकटेच एका जागी बसलेले असतात. अंधांच्या आश्रमात जाण्याची मागणी ते करत आहेत. दोन दिवसांपासून ते अन्न घेण्यासही तयार होत नसल्याने अखेर दीपकने आपल्या मालवाहू वाहनाचा सात हजार रुपये हप्ता न भरता तो खर्च त्यांना छत्तीसगड राज्यातील रायगड येथील अंधांच्या आश्रमात सोडण्यासाठी केला. २५ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता पंजाब फेस्टिव्हल विशेष साप्ताहिक रेल्वेने ते नागपूरपर्यंत जाऊन पुढे खासगी वाहनाने छत्तीसगड राज्यातील मिटठूमुडा (जि.रायगड) येथील कृष्ण प्रणामी पना घर आश्रमात सोडण्यात आले असल्याचे दीपकने अभिमानाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...