आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाहीर पक्ष प्रवेश:संकटं काळात सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहिले - शरद पवार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बीडचे माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंग गायकवाड यांचा आज राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

राज्यात वेगळ्या पद्धतीने राज्य चालवण्याचा‌ प्रयत्न आम्ही करतोय. तिन्ही पक्षाच्या आघाडीकडून वर्षभर चांगले सरकार चालवण्याचा आमचा‌ प्रयत्न राहिला असून संकटं आली, कधी अतिवृष्टी झाली तरीही सरकार सामान्य माणसाच्या पाठीमागे उभे राहिले असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

महाराष्ट्रात ३० वर्षे बघतोय बीड जिल्हा बघतोय. एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा हे कळते. जयसिंगराव गायकवाड जिथे गेले होते तिथे त्यांचं मन रमलं नाही. देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही. तर मतदारसंघात फिरत राहिला. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी केलं. त्यांचे पक्षात स्वागत आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीचा प्रतिनिधी सर्वांना घेऊन काम करत आहे. अनेक संकटात जनतेच्या खांद्याला खांदा लावून सरकार व लोकप्रतिनिधी काम करत असल्याची पोचपावती शरद पवार यांनी दिली.

रोगराईचे आज संकट आहे. संकट सुरुवात होण्याआधी प्रदेशाध्यक्ष यांनी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले ते काम थांबले परंतु कोरोना संपल्यानंतर तेच काम जोमाने सुरू होईल असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.

विकासाच्या प्रश्नासाठी इथून पुढे आपल्याला सहकार्य करु - अजित पवार

इथून पुढच्या काळात विकासाचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आपल्याला सहकार्य करु असे आश्वासन देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत केले. मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा फायदा होणार आहे, असेही अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत - जयंत पाटील

भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून जयसिंगराव गायकवाड प्रवेश करत आहेत. त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. प्रत्येकाने ताकदीने पक्ष वाढवला आहे. जयसिंगराव गायकवाड भाजपात काम करत होते. मात्र भाजप जनतेच्या हिताची कामे करत नाही. हे लक्षात आल्यावर ते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. सामान्य माणसाशी जिव्हाळा असणारा नेता आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

पश्चिम महाराष्ट्रासारखी ताकद मराठवाड्यात निर्माण करु - धनंजय मुंडे

पश्चिम महाराष्ट्रात जशी ताकद राष्ट्रवादीची आहे त्याच ताकदीची राष्ट्रवादी मराठवाडयात जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशाने निर्माण होईल असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. मला मनापासून आनंद आहे. काकांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात व मराठवाडयात हत्तीचं बळ मिळाले आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.

भाजपात कामाची कदर नाही - जयसिंगराव गायकवाड

भाजपात कामाची कदर नाही, कौतुक नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी बोलताना केला. जिथे कोंडमारा होतोय त्या पक्षात रहायचं नाही ठरवलं आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेत असल्याचेही जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे असे प्रवेश करताना जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser