आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:ऊजनी धरणातील पाणीसाठा प्लस मध्ये, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कंदर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश जगताप

सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शेतीची जीवनवाहीनी मानले गेलेले उजनी धरण आज (दि. १८) रोजी प्लस मध्ये आले आहे. उन्हाळ्यात दि. १४ मे ला मायनस मध्ये गेलेला पाणीसाठा आज रोजी मृत पाणीसाठ्याच्यापेक्षा अधिक होणे ही शेतीव पुरक क्षेत्रांसाठी दिलासादायक बाब आहे.  

उजनी धरण हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात मोठा जलसाठा आहे. उजनीत सध्या ६३ टि.एम सी. एवढा पाणीसाठा झाला आहेत. सातत्यपूर्ण पाऊस राहिला तर ऑगस्ट महिण्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकेल. मागील वर्षी अवकाळी पावसाने पूर्ण भरलेल्या धरणाची पाणि पातळी उन्हाळ्यात खलावली होती. मात्र जून व जूलै महिण्यात झालेल्या पावसाने पाणीसाठा वाढला.

मागील वर्षी धरणातील पाणीसाठा थोडा उशीरा म्हणजे ३० ऑगस्ट २०१९ ला प्लस मध्ये आला होता. मात्र नंतर केवळ अवकाळी पावसाच्या जोरावर धरण १००% भरले होते. यावर्षी दि. १७ जूलै रोजी पाणीसाठा मायनस ०.२६% होता आणि दि. १८ जूलैलाच धरण प्लसमध्ये आले आहे. सुमारे दीड महिना लवकर झालेला पाणीसाठा हा धरणाच्या पाण्यावर धरण फुगवटा व पाणलोट क्षेत्रात  केल्या जाणार्‍या उसाच्या शेतीसाठी आणि साखर कारखानदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे उस उत्पादक शेतकरी वर्गासाठी ही आनंददायक बातमी आहे.

यावर्षी करोनाच्या साथीमूळे सर्वत्र टाळेबंदी असली तरी उन्हाळ्यातही धरणपात्रात टिकून असलेले पाणी आणि या वर्षीचा उत्तम पाउस यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची उस लागवडी करण्यात आल्या होत्या. धरणातील पाणीसाठा हा उस लागवडींसाठी मोठा कारक घटक असतो. या हंगामत आडसाली उस लागवडींचे अत्यंत प्रमाण चांगले आहे आणि यापुढेही राहील.    

उजनी धरण व पाणीसाठ्याचे महत्त्व

उजनी धरणातून आसपासच्या १५-२० लहानमोठ्या शहरांतील सुमारे २५ ते ३० लाख लोकांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. उजनीच्या पाण्याचा नदीपात्र, कालवा व सिना जोड कालवा  अशा तीन मार्गांनी विसर्ग होतो. नदीपात्र व कालव्याद्वारे सोलापूर जिल्यातील मोठा भुभाग सिंचनाखाली येतो. तसेच सिना नदीला जोडलेल्या कालव्याच्या बोगद्याने जाणार्‍या उजनीच्या पाण्याने मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील काही क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. धरणक्षेत्रात सुमारे ५० हजार लोक मासेमारी व निगडीत कार्यात आहेत.

    या धरणाच्या पाण्यावर केल्या जाणार्‍या हजारो एकर उस शेतीद्वारे तीन जिल्ह्यात मिळून ४५ साखर कारखाने आहेत. तसेच १० औद्योगिक वसाहती आहेत. 

धरणग्रस्तांचे आर्जव

उजनी धरणाच्या पाणीफुगवट्यामुळे करमाळा, माढा (जि सोलापूर)इंदापूर, दौंड (जि. पुणे), व कर्जत (जि. अहमदनगर) या तालुक्यांतील काही गावांतील जमीनी पाण्याखाली गेल्या. त्यातून अनेकांना विस्थापीत व्हावे लागले. काही लोकांच्या जमीनी आहेत. पण आता पूर्वीप्रमाणे धरणातील पाणी वर्षभर टिकेल याची शाश्वती नाही. त्यामुळे या धरणग्रस्त शेतकर्‍यांत असंतोष आहे. निदान यावर्षी तरी धरणाच्या पाण्याचे नियोजन व्हावे अशी अपेक्षा केली जात आहे. नाहीतर दरवर्षी धरण पूर्ण भरुनही उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवेल. त्याच बरोबर उजनी धरणाच्या पात्रात बुडीत बांधारे बांधून स्थानिक शेतकरी वर्गासाठी काही पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी केली जात आहे.   

आजची आकडेवारी सायंकाळी ६ वाजता.

एकूण पाणीपातळी-    ६९१.३ मीटर

एकूण पाणीसाठा   -     १८०२.८२ दलघमी

उपयुक्त साठा        -      ०.०१ दलघमी

टक्केवारी              -        ०.०१%

दौंड विसर्ग             -    २२२३ क्युसेक

उपयुक्त साठा टीएमसी -      ०.०१

एकूण साठा टीएमसी   -       ६३.६६