आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळाव्यात आरोप प्रत्यारोपांच्या तोफा की पावसाच्या सरी?:उद्धव-शिंदे यांच्या मेळाव्यावर संकट कायम, मुंबईत पावसाची तुरळक हजेरी!

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान घटस्थापनेच्या दिवशी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे नवरात्रीचे नऊ दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. वास्तविक पाहता राज्यातील काही भागात यादरम्यान पाऊस झाला असला तरी सर्वदूर पाऊस झाला नाही. मात्र, 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसऱ्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या दसरा मेळाव्यांवर पावसाचे सावट असल्याचे दिसून आले आहे.

शिवसेना नेत्यांच्या बंडानंतर यंदा पहिल्यांदीच मुंबईत दोन दसरा मेळावे होत आहेत. दादर येथील शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होत असून बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा होणार आहे. त्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. मात्र, पावसामुळे या मेळाव्यांवर संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शिंदे गटाची 3 पट जास्त तयारी

सत्ताधारी एकनाथ शिंदे गटाने ठाकरे गटाच्या तिप्पट नियोजन केले आहे. महाराष्ट्रातून उद्धव गटाने सुमारे 1,792 वाहनांची व्यवस्था केली असून 60 हजार शिवसैनिक मुंबईला नेण्यात येत आहेत. तर शिंदे गटाने तिप्पट म्हणजे 5,151 वाहनांची व्यवस्था केली आहे. शिंदे गटाच्या वतीने सभेपर्यंत पाहोचण्यासाठी वाहनाची, मुक्कामाची, जेवणाची, आसनाची अशा सर्वच सुविधांची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

पावसाला पोषक वातावरण

राज्यात मुसळधार पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी, परतीच्या मान्सूनसाठी सध्या राज्यात पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वास्तविक पाहता राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यानुसार पाच ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी मराठवाडा आणि विदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत सरी, विदर्भाला यलो अलर्ट

मुंबईत देखील गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले आहे. दसऱ्याच्या दिवशीच म्हणजेच दसरा मेळाव्यावर देखील या पावसाचा संकट कायम असल्याचे दिसून येत आहे. मुंबई ठाणे परिसरात तुरळ ठिकाणी रिमझिम पाऊस सुरूच आहे. तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी अशा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात देखील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना हवामान विभागाच्या वतीने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...