आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवे-खोतकर यांच्यात रंगला वाद:जालना लोकसभा मतदारसंघ कोणाला सोडणार नाही : दानवे

जालना / कृष्णा तिडके6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई होऊन चार दिवस झाले नाही तोच दोघांतील वादात ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. ‘मी जालना लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडलेला नाही,’ असे खोतकर यांनी म्हटले, तर गेली २५ वर्षे मेहनत घेऊन सुपीक केलेली जमीन मी इतरांना कसायला कशी देईन?’ अशा शब्दांत जालना लोकसभा मतदारसंघ सोडणार नाही, असे दानवे यांनी शनिवारी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने चार दिवसांपूर्वीच रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात दिलजमाई झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खोतकर हे दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी चहापानासाठी गेले होते. तेथेही दोघांमध्ये चर्चा झाली. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘आमच्या दोघांत आता कोणताही वाद राहिला नाही,’ असे दोघांनीही जाहीर केले होते. तेव्हा खोतकर यांनी, ‘जालना लोकसभा मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा,’ अशी मागणी दानवेंकडे केल्याचे मिश्कील शैलीत सांगितले होते. परंतु शनिवारी जालन्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खोतकर यांनी जालना लोकसभा मतदारसंघावरचा दावा सोडला नाही, हे अत्यंत स्पष्टपणे सांगितले. त्यामुळे दानवे यांनीही हा विषय गांभीर्याने घेतला आहे.‘मतदारसंघ कुणाला सोडणे हे माझ्या हातात नाही. हा मतदारसंघ मी सोडणार नाहीच. ज्या मतदारसंघात भाजप ९ वेळा जिंकला आहे तो मतदारसंघ भाजप कुणाला देणार नाही,’ असे दानवे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...