आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्यासाटी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, असे वक्तव्य करून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधले वादळ शमल्यानंतर जयंत पाटील आज स्वगृही सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ते अनेकांना जोरदार टोले हाणले.
आधी टोलोबाजी...
जयंत पाटील यांनी आज 'एक तास राष्ट्रवादीसाठी' या उपक्रमानिमित्त वाळवा तालुक्यातील साखराळे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तर प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येईन या वक्तव्याची चिंता, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 वीरांनी करावी, असा टोला हाणला.
नंतर मुद्द्याचे...
जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्यावरही सूचक भाष्य केले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे वादळ निर्माण झोले होते. मात्र, बरेच लोक त्यांच्या राजीनाम्यासाठी देव पाण्यात ठेऊन बसले होते. जे होत आहे, ते व्हावे, अशी त्यांची इच्छा होती, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा एकदा आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. हे लोक कोण, पक्षातले की पक्षाबाहरेचे, असा प्रश्नही आता विचारला जात आहे.
राजीनामा धक्काच होता...
शरद पवारांनी अचानक राजीनामा दिला. हा एक धक्काच होता. ज्यावेळी पवार साहेबांचे नेतृत्व स्वीकारून आपण काँग्रेसमधून बाहेर पडलो. त्यावेळी आपले ध्येय होते, एक विचार होता. साहेबांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे आपण सर्व अस्वस्थ झालो. आज देशासमोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. येत्या काळात महत्त्वाच्या निवडणुका आहेत, अशा परिस्थितीत पवार साहेबांसारख्या नेतृत्वाने राजीनामा देऊन कसे चालणार होते. म्हणून आम्ही पवार साहेबांची मनधरणी करून पवार साहेबांना राजीनामा परत घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती स्वीकारलीही.
महागाईचा आगडोंब...
जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातूनही जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणतात की, आज देशात एक वेगळी परिस्थिती आहे. महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारीने तरुण पिढी हैराण झाली आहे. मात्र, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या महत्त्वाच्या विषयांवर भर न देता इतर गोष्टींकडे लोकांचे लक्ष वळवले जात आहे. दुर्दैवाने देशातील माध्यमेही यात सहभागी होत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष...
जयंत पाटील पुढे म्हणतात की, महाविकास आघाडीच्या असंख्य सभा आज राज्यभरात पार पडत आहेत. मात्र, ज्या दिवशी ज्या शहरात सभा आहे त्याच शहरात भाजपतर्फे मोर्चे काढले जातात. या मोर्चांमध्ये बोटांवर मोजण्याइतकेच लोक असतात. मात्र, माध्यमे त्याला अधिक कव्हरेज देतात. मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे हेच भाजपचे ध्येय आहे.
भाजपची इतरांवर नजर...
जयंत पाटील पुढे म्हणतात की, आज शिवसेनेसारखा मजबूत पक्ष भाजपने फोडला. आता त्यांची नजर इतर पक्षांवर आहे, पण पवार साहेबांच्या भक्कम नेतृत्वखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंधपणे काम करणार याचा दिलासा आपल्या सर्वांना काल मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वात इथल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या प्रश्नांसाठी लढत होती आणि या पुढेही जोमाने लढत राहणार.
संबंधित वृत्तः
मी पुन्हा येईन म्हटले की येतोच, कसा येतो हे तुम्हाला माहिती; फडणवीसांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.