आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'कोरोना हा 'त्या' वृत्तीच्या लोकांना होतो, कोरोनाने मरणारे जगण्याच्या लायक नव्हते', असे वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. सांगतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि समाज एकत्र येऊन प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे योग्य नाही. आवश्यकता वाटल्यास वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल', असा इशारा जयंत पाटलांनी संभाजी भिंडेचे नाव न घेताल दिला.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, सध्या परिस्थिती बिकट आहे. अशा कोरोनाच्या संकटकाळात समाजात गैरसमज करणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशावेळी आंबे खाल्ल्यावर मुले होतात, अशा प्रवृत्तीच्या लोकांकडून गैरसमज करणारी विधाने होत असतील तर ते अयोग्य आहे. एरवी अशी वक्तव्यं खपून जातात. पण सध्याच्या काळात अशा वक्तव्यांमुळे त्या संकटाचे गांभीर्य कमी होते. त्यामुळे अशी वक्तव्ये कायद्याच्यादृष्टीने तपासून त्यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
काय म्हणाले होते संभाजी भिडे ?
'कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसे मरत आहेत, ती जगण्याच्या लायकीची नाहीत. समाज चालवण्यासाठी शासन आहे. पण, शासन हे दुशासन होता कामा नये. सध्या निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. सरकारच्या निर्णयांमुळे संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही.'
'कोरोनामुळे मास्क घालायला लावतात. पण, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढलाय. काही गरज नाही मास्क लावण्याची, हा सगळा मूर्खपणा आहे. हातावर पोट असलेली अनेक माणसे उद्ध्वस्त झाली. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायची, गांजा अफू दारु दुकाने वाढवायचे काम सुरु आहे. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे', असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.