आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:धंदा गेला, कणा मोडला, तरीही कोकणवासी आवरासावरीला जुंपला

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड जिल्ह्यातील मुरुडनजीकच्या काशीद बीचवरील स्टॉलधारक शरद बेलोसे मुलासह कोसळलेल्या स्टॉलची डागडुजी करण्यासाठी आले होते. छायाः अशोक गवळी
  • तीन महिने लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प, त्यातच चक्रीवादळाच्या धुमाकुळाने होत्याचे नव्हते केले

कोकणातून जयप्रकाश पवार

लॉकडाऊनचे तीन महिने आणि त्यानंतर चक्रीवादळाचा धुमाकूळ. यामुळे कोकण कोलमडले आहे. प्रसिद्ध काशीद बीच उद्ध्वस्त झाले आहे. पण कोकणवासी आवरासावरीच्या कामात नव्या जोमाने गुंतला आहे. त्याची ही कहाणी

ऐन सुट्ट्यांचा मोसम. मुरुड किनाऱ्यावरील काशीद बीच पर्यटकांच्या भरतीने ओसंडून वाहे तेव्हा शरद बेलोसेंना क्षणाचीही फुरसत मिळत नव्हती. ते, त्यांची पत्नी, मुलगा, पुतण्या असं सारं कुटुंबच सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यटकांच्या खातीरदारीसाठी बीचवर उभे असत. पत्नी आणि ते चहानाष्ट्याचा स्टॉल सांभाळत, मुलगा आणि पुतण्याचे वॉटर स्पोर्ट‌्स होते. ८ मार्चपासून आमच्याच जगण्याचा खेळ सुरू आहे, हातातला दोरखंड बाजूला ठेवत बेलोसे सांगत होते. बीचवर पर्यटकांना बंदी करण्यात आली आणि बेलोसेंसारख्या पन्नास स्टॉलधारकांचा धंदा बंद झाला. लॉकडाऊनचे तीन महिने आणि त्यानंतर चक्रीवादळाचा धुमाकूळ. बेलोसेंचा स्टॉल त्यात आडवा झालाय.

मेवा सुकवून ठेवा : ‘जे सगळ्यांचं झालं ते आपलं झालं’

पर्यटकांसाठी कॉटेज, कोकणी पदार्थांच्या, घरगुती फिश डिशच्या खानावळी यासोबतच बहरलेला व्यवसाय म्हणजे कोकण मेवा विक्री. हटाळा गावातील आश्लेषा शेवडेंनी दहा-बारा वर्षांपूर्वीच या व्यवसायाची सुरुवात केली. नागाव सोडलं की दोन्ही बाजूंना ‘शेवडे यांचे कोकण मेवा बाझार’ असे बोर्ड लागतात. ते सर्व शेवडे भाऊबंदांचे. आश्लेषा आधी दिरांकडे पापड लाटायला जात होत्या. थोडंसं भांडवल जमवून त्यांनी त्यांच्याच अंगणात कोकण फूडचा स्टॉल उभारला. दोन बायका हाताशी घेतल्या आणि तांदळाचे पापड, पोह्यांचे मिरगुंड, कडवे वाल, चिंचेचे गोळे, आमसुलं या स्थानिक चिजा विक्रीला ठेवल्या. आंबापोळी, फणसपोळी, आंबावडी हा माल तळकोकणातून मागवू लागल्या.

जानेवारी-फेब्रुवारीनंतर पर्यटकांची गर्दी वाढते म्हणून त्यांनी भरून ठेवलेला पन्नास हजारांचा माल तसाच शिल्लक राहिला. ‘आता काय करणार, जे सगळ्यांचं झालं ते आपलं झालं’, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला साजेसं उत्तर त्या देत त्या बॉक्समध्ये भरून ठेवलेला माल अंगणात वाळवू लागल्या.

0