आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर:कोरोना पॉझिटिव्ह महिलेची धावत्या रुग्णवाहिकेत प्रसूती; आई व बाळ सुखरूप

लातूर / पंकज जैस्वाल8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरोदर महिलेची तपासणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातून लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे तिला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना रस्त्यातच बुधोडा (ता. औसा) गावाजवळ तिची प्रसूती झाली. आई व बाळ दाेघेही सुखरूप आहेत.

शनिवारी उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे प्रसूती कक्षामध्ये अवघड परिस्थितीत बाळंतपणासाठी महिला रुग्ण आलेली असताना त्या महिलेची कोरोना तपासणी करण्यात आली. तिचा अहवाल काेराेना पॉझिटिव्ह आला. दरम्यान, निलंगा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह तेथील स्टाफने महिलेचे बाळंतपण करण्यास प्रयत्न सुरू केले. परंतु गुंतागुंतीची परिस्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाइलाजास्तव त्या महिलेला लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तातडीने शासकीय वाहन १०८ ची व्यवस्था करून त्याद्वारे लातूरकडे पाठविण्यात आले.

या रुग्णवाहिकेमध्ये निलंगा येथील स्टाफ ब्रदर अतुल शिंदे यांना कोरोना किटसह मदतीला देण्यात आले. निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिलीप सौंदळे व डॉ.दिनकर पाटील हे मोबाइलच्या माध्यमातून स्टाफ ब्रदर अतुल शिंदे यांच्यासोबत सतत संपर्कात होते. दरम्यान, रुग्णवाहिका निलंग्याहून सुमारे ४५ किमीवर बुधोडा (ता.औसा) या गावाजवळ आली असता महिलेच्या प्रसवकळा तीव्र झाल्या. महिलेसोबत अन्य एक महिला नातेवाइक उपस्थित होती. तेथून लातूर १५ किमीवर असल्याने प्रसंगावधान राखत स्टाफ ब्रदर अतुल शिंदे यांनी त्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसूती व्यवस्थितरीत्या केली. सध्या आई व बाळ सुखरूप आहेत.

बातम्या आणखी आहेत...