आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:45 वर्षांपूर्वीच सहकारी गमावला, मात्र शेवटपर्यंत राम-लक्ष्मण याच नावाने संगीत देत जाेडी टिकवली

नागपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उपाख्य विजय पाटील यांचे निधन
  • मैने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हंै चित्रपटांत दिले होते संगीत

१९९० च्या दशकात आपल्या सुमधुर सुरावटींनी तरुणाईचे भावविश्व घडवणारी प्रख्यात संगीतकार जोडी राम-लक्ष्मण यांच्यातील लक्ष्मण उपाख्य विजय काशीनाथ पाटील (७९) यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते नागपूर येथे मुलाकडे राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा पाटील, मुलगा संगीतकार अमर पाटील, सुना, नातवंडे, दोन मुली असा आप्त परिवार आहे. आजपर्यंत त्यांनी सुमारे ९२ हिंदी, मराठी व भाेजपुरी चित्रपटांना संगीत दिले आहे. मुंबईत आल्यानंतर विजय पाटील यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी पाटील आणि हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले.

१९७६ मध्ये जोडीदार सुरेंद्र हेंद्रे यांचे किडनीच्या आजाराने निधन झाले. याच काळात पाटील यांना ‘एजंट विनोद’चे काम मिळाले. पण हेंद्रेंच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण नावाने संगीत देणे विजय पाटील यांना बरोबर वाटेना. म्हणून त्यांनी राम-लक्ष्मण याच नावाने संगीत देणे सुरू ठेवले.

‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम-लक्ष्मणच : ‘राजश्री’चा सिनेमा म्हटला की राम लक्ष्मण यांचे संगीत हे समीकरण नुसते रुढच झाले नाही तर यशस्वीही झाले. १९७६ मध्ये त्याची सुरुवात झाली. १९८९ च्या ‘मैने प्यार किया’ या सलमान खान -भाग्यश्री अभिनीत चित्रपटाने त्यांना अमाप यश आणि नाव दिले. यासाठी त्यांना फिल्मफेअर पारितोषिक मिळाले. त्या नंतरचे ‘हम आप के है कौन’ व ‘हम साथ साथ है’ हे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजले.

कादर आॅर्केस्ट्रातून केली सुरुवात : विजय पाटील यांची सुरूवात नागपुरातील गाजलेल्या कादर आॅर्केस्ट्रातून झाली. एम. ए. कादर हे त्यांचे बालमित्र. बाबा स्वामी, एम. ए. कादर व विजय पाटील हे तिघे आॅर्केस्ट्रात गायचे. काही वर्षांनी ते मुंबईला निघून गेले. त्यांच्या जाण्याने एक हृदयस्थ मित्र गमावला, अशी शोकसंवेदना कादर यांनी व्यक्त केली. एकदा झालेली मैत्री ते शेवटपर्यत जपत. त्यांनीच मला अंतिम न्याय व फौज या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. कादर संगीत अकादमीचे उद्घाटन आम्ही त्यांच्या हस्ते केले होते, अशी आठवण कादर यांनी सांगितली.

दुकलीने १९९० चे दशक गाजवले
हिंदीत ‘हम से बढकर कौन’, ‘सुन सजना’, ‘दिवाना तेरे नाम का’, ‘पोलिस पब्लिक’, ‘हंड्रेड डेज’, ‘दिल की बाजी’ ‘पत्थर के फुल’ आदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. उषा मंगेशकर यांच्याकडून त्यांनी गाणी गाऊन घेतली.

विजय पाटील यांच्या ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील दिल दिवाना बिन सजना के, आते जाते हसते गाते, मेरे रंग में रंगनेवाली, कबुतर जा जा जा आदी गाण्यांनी तरुणाईला अक्षरश: वेड लावले.

‘हम आपके हंै कौन’, ‘हम साथ साथ है’ रिलीज झाला. या चित्रपटातील गाण्यांनी रेकाॅर्डब्रेक लोकप्रियता मिळवली. ‘दीदी तेरा देवर दिवाना’, ‘पहला पहला प्यार है’ लोक आजही विसरलेले नाहीत.

मराठीतही उमटवली छाप : मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांचे संगीतकार म्हणून राम-लक्ष्मण खूप गाजले. ‘पांडू हवालदार’, ‘तुमचं आमचं जमलं’, ‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ असे एकाहून एक धमाल सिनेमे आणि त्यातील गाणी खूप गाजली.

बातम्या आणखी आहेत...