आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊत यांनी घेतला 'राज'सभेचा समाचार:म्हणाले- भोंग्यामागची पॉवर कोणाची सर्वांनी माहिती, बाबरीच्या मुद्द्यावर फडणवीसांनाही दिले प्रत्युत्तर

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'बाबरी ढाचा' पाडला तेव्हा शिवसेना कुठे होती? असा प्रश्न उपस्थित केला होता. यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. तर दुसरीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभेचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मनसेच्या भोंग्यांमागे इलेक्ट्रिसिटी किंवा पॉवर कोणाची आहे, हे सर्वांनाच माहिती आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. ​​​

भोंग्याचा मुद्दा राजकीय स्वार्थासाठी

मशिदीवरील भोंग्यांचा विषय हा कायदेशीर विषय आहे. तो कायदेशीर मार्गाने सोडवला जाईल. त्यासाठी पोलिस आणि न्यायव्यवस्था सक्षम आहे. त्याच माध्यमातून योग्य ती कारवाई होईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. सध्या तुम्हाला काहीच काम नसल्याने तुम्ही राजकीय स्वार्थासाठी या विषयावर बोलत आहात, असा टोला देखील त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.

मशिदींवरील भोंग्याबाबत आम्हीही आंदोलन केले होते, लढाई केली होती. त्यामुळे हा विषय कायद्यानुसारच सोडवला जाईल. सर्वांनीच कायद्याचे पालन केले पाहिजे असा सल्ला देखील त्यांनी दिला. भोंग्यांच्या मुद्यांपेक्षा राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नावर आधी बोला, असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले.

हे लेच्यापेच्यांचे राज्य नाही

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री सक्षम आहेत. राज्यात लेच्यापेच्यांचे राज्य नाही, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताच प्रश्न निर्माण होणार नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. ​​​भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या वतीने राज्य सरकारला 4 मे पर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही कायदा सुव्यवस्था राखण्यात कोणतीही अडचण नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

आधी त्यांच्यामधील 'अहंकाराचा रावण' नष्ट करावा

रावणाचा इतिहास पाहिला तर रावणाचा अंत त्याच्या अहंकारामुळे झाला होता. रावण हा विद्वान होता. केवळ अहंकारामुळे त्याचा नाश झाला. सत्ता गेल्यामुळे वेगळाच अहंकार विरोधकांच्या अंगात संचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्यांच्या अंगात संचारलेला अहंकार नष्ट करावा, असा पलटवार देखील संजय राऊत यांनी केला. विरोधकांनी आधी रामायण वाचले पाहिजे. रामा बरोबरच रावणाचा इतिहास देखील विरोधकांनी वाचावा असा सल्लाही त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...