आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन बंदच:कोरोनाने मेलो तरी चालेल, उपासमार नको; पाचगणी, महाबळेश्वर बंद असल्याने स्थानिकांची आर्त हाक, 50 लाखांचे नुकसान

पाचगणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थानिक प्रशासन म्हणते, आमच्यासाठी लोकांचे जीव महत्त्वाचे

महाराष्ट्राचे नंदनवन अशी ओळख असलेले पाचगणी आणि महाबळेश्वर अजूनही पर्यटकांसाठी बंदच आहे. या भागात कोरोनाचे रुग्ण जरी नसले तरी लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत म्हणून ही पर्यटनस्थळे अद्यापही सुरू करण्यात आली नाहीत. पाचगणी आणि महाबळेश्वर येथील शासन उत्पन्न आणि स्थानिकांचे उत्पन्न हे पूर्णपणे पर्यटकांवरच अवलंबून आहे. शासनाला या बंदमुळे मोठा फरक पडत नसला तरी स्थानिकांना मात्र दोन वेळच्या जेवणासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. आम्ही कोरोनाने मेलो तरी चालेल पण आता ही उपासमार शासनाने बंद करावी, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.

स्ट्रॉबेरी, दाट धुके आणि १०० टक्के ऑक्सिजन यामुळे पर्यटकांचा पाचगणी, महाबळेश्वरकडे कायमच ओढा राहिलेला आहे. पण सध्या ही पर्यटनस्थळे बंद असल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. पाचगणीची लोकसंख्या १४ हजार ८९७ एवढी आहे तर महाबळेश्वरची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक हा परिसर एरवी पर्यटकांनी गजबजलेला असतो. या लेक परिसरात १०० बोटी असून एका बोटीचे दिवसाचे उत्पन्न चार हजारांच्या आसपास असते. पाचगणी येथेदेखील १७१ घोडे असून, फोटोग्राफी, घोडागाडी, दुर्बिण, फेरीवाले असे ७०० व्यावसायिक, २०० नोकरवर्ग पर्यटकांवरच अवलंबून आहेत. इथे शेती पिकत नाही, व्यवसाय बंद आहे तर आम्ही घर कसे चालवायचे, असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे उत्तम सुपडे यांनी सांगितले.

परिषदेचे मोठे नुकसान
पाचगणी आणि महाबळेश्‍वर परिसरात दिवसाला ५ ते ७ हजार पर्यटक भेट देतात. यामधून आठवड्याला पाचगणीला चार लाखांचे उत्पन्न मिळते. गेल्या चार महिन्यांपासून पर्यटन पूर्णपणे बंद असल्यामुळे महाबळेश्वरसह पाचगणी नगर परिषदेचे लाखोंचे नुकसान झाल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

४३ घोडागाड्या उभ्या
कोरोना इथे सुरुवातीपासून कमीच आहे. आमच्यापैकी सगळ्यांनी लस घेतली आहे. आमच्या ४३ घोडागाड्या गेल्या दोन वर्षांपासून उभ्या आहेत. हॉटेलचे लाइट बिल तरी कुठून भरायचे हा प्रश्न आमच्यासमोर आहे. लवकरात लवकर जर ही बंदी उठली नाही तर रोगापेक्षा उपासमारीने आम्ही मरून जाऊ, असे मत प्रसाद ननावरे यांनी व्यक्त केले.

सोने मोडून घोड्यांचा सांभाळ
पाचगणी परिसरात आम्ही १७१ अश्वपाल आहोत. आधीच्या लॉकडाऊनमध्ये आम्ही घरातील सोनं-नाणं मोडून घोड्यांसह कुटुंबाचा सांभाळ केला. भुकेने ३०-४० घोडे दगावले. इतर पर्यटनस्थळे उघडलेली असताना पाचगणी-महाबळेश्वर अजूनही बंद का ? २० वर्षांत नगरपालिकेची एक रुपयाची आम्हाला मदत नाही. आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न सुदर्शन शिंदे आणि अंकुश भिलारी या व्यावसायिकांनी उपस्थित केला.

आदेशानुसारच बंद
शासनासह स्थानिकांचे आर्थिक नुकसान होत आहे ही सत्यता आहे. पण शासनाच्या आदेशानुसारच ही पर्यटनस्थळे बंद आहेत. आम्हाला लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. गेल्या पंधरा दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण या भागात आढळलेला नाही. ४५ पेक्षा अधिक वयोगटातील ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांचे लसीकरण आम्ही केले आहे. पैशांअभावी आमची विकासकामेदेखील खोळंबली आहेत. शासन आदेश येताच आम्ही पर्यटनस्थळे सुरू करू. - गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी

बातम्या आणखी आहेत...