आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा विळखा:महाराष्ट्रातून आजवर 10 लाख परप्रांतीय कामगारांचे स्थलांतर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, राजस्थानचे कामगार सर्वाधिक

मुंबई, नाशिक, औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादहून उत्तर प्रदेशला रवाना होण्यापूर्वी काही कामगारांनी गाडीत बसण्यापूर्वी रेल्वेला असा नमस्कार केला. छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
औरंगाबादहून उत्तर प्रदेशला रवाना होण्यापूर्वी काही कामगारांनी गाडीत बसण्यापूर्वी रेल्वेला असा नमस्कार केला. छाया : रवी खंडाळकर
  • 38 हजार उद्योग सुरू, साडेचार लाख कामगारांचा तुटवडा
  • तब्बल पाच लाख परप्रांतीय कामगार केवळ मुंबई अन् उपनगरातील

कोरोनाचा कहर, आग ओकणारा सूर्य अशा परिस्थितीत घराकडे जाण्याच्या ओढीने लाखो परप्रांतीय कामगार रेल्वे, ट्रक, टेम्पो, रिक्षा किंवा मिळेल त्या खासगी वाहनाने आपल्या गावाकडे निघाले आहेत. महाराष्ट्रातून आतापर्यंत १० लाख परप्रांतीय कामगार, मजूर गावाकडे परत गेले अाहेत. यापैकी किमान पाच लाख कामगार तर केवळ मुंबई आणि उपनगरांमधीलच आहेत. दरम्यान, राज्यातील ६४ हजार ५०० पैकी ३८ हजार उद्योग सुरू झाले आहेत, परंतु यामुळे औद्योगिक क्षेत्रात तुटवडा निर्माण झाला असून साडेचार लाखांवर जागा रिक्त झाल्या आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून परप्रांतीय मजूर, कामगारांचा परतीचा प्रवास सुरू झाला अाहे. गुरुवारीही तो सुरूच होता. राज्यातील जवळपास सर्वच राष्ट्रीय, राज्य महामार्गावर खासगी वाहने, पायी जाणाऱ्या कामगारांचे जथ्थे दिसत आहेत. सर्वाधिक कामगार हे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, राजस्थान, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यांमध्ये परत गेले आहेत. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार राज्यात साडेसहा लाख परप्रांतीय कामगार, मजुरांना घरी जाण्याची परवानगी देण्यात अाली आहे. श्रमिक रेल्वेमधून अडीच लाख कामगार, तर एसटी बसेसमधून एक लाख परप्रांतीयांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडण्यात आले आहे. यापैकी अनेक जण मिळेल त्या वाहनाने किंवा पायीच परत गेले आहेत.

भिवंडी ते ओरिसा दीड हजार किलोमीटर सायकलस्वारी :

भिवंडीतील फॅक्टरीत काम करणारे सुशीलकुमार आणि त्याचे सहकारी महिनाभरापासून खोलीवर बसूनच होते. काम बंद असल्याने मालकाने त्यांना प्रत्येकी २ हजार रुपयेच पगार दिला. त्यातूनच त्यांनी नवीन सायकली घेऊन गावाकडे कूच सुरू केली. १५८० किलोमीटरचा प्रवास रणरणत्या उन्हात आणि सायकलवरून करण्याचे त्यांचे ते अॅडव्हेंचर नव्हते, तर अगतिकता होती.

तब्बल पाच लाख परप्रांतीय कामगार केवळ मुंबई अन् उपनगरातील

नवी मुंबईहून ट्रकमधून बिहारला निघालेले ३५ मजूर. ट्रकचे भाडे १ लाख ४० हजार. सगळ्यांनी वर्गणी काढून दिला १० हजारांचा अॅडव्हान्स, बाकीचे बिहारला पोहोचल्यावर घरवाल्यांकडून देणार. गावाकडून पैसे मागवून नवीन सायकल खरेदी करून ओडिशाला निघालेले शेकडो मजूर. नाशकातील मुंबई-आग्रा महामार्गावर आठवडाभरापासून मालवाहू वाहनांमध्ये मालासारखी माणसं वाहून नेली जात आहेत.

परतण्याची शाश्वती नाही

लॉकडाऊनच्या दीड महिन्यात भरडल्या गेलेल्या कामगारांकडे पुन्हा परत कधी येणार, येणार की नाही या प्रश्नाचे उत्तर नाही. ते म्हणतात, पहिल्यांदा जिवंत घरी जाऊ द्या. काही जण म्हणतात, कमी कमवू, पण पुन्हा येणार नाही. गावी गेल्यावर खाणार काय, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. रिक्षावाले म्हणतात, तिथेच रिक्षा चालवू, पुन्हा मुंबईत परतणार नाही. पण, त्यांचा परवाना आहे मुंबईचा.

बातम्या आणखी आहेत...