आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात शोधाशोध:राज्यभरात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा तुटवडा; शेतकरी त्रस्त; दरवर्षी 4 लाख, यंदा 2 लाख क्विंटलच बियाणे

अकोलाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारचे आवाहन, स्वत:चे बियाणे वापरा, शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नाही

खरीप पेरणी हंगामाच्या तोंडावर राज्यात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याचा यंदा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. खासगी कंपन्यांचे महागडे बी शेतकऱ्यांना परवडत नसल्याने महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, महामंडळाने यंदा सोयाबीन बियाण्याचा केवळ २ लाख क्विंटल एवढाच पुरवठा बाजारात केल्याने टंचाई भासत आहे.

खासगी बीज कंपन्यांच्या खिसेकापू धोरणामुळे त्रस्त असलेले विदर्भ-मराठवाड्यातील अनेक शेतकरी महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची पेरणी करतात. मात्र यंदा अपेक्षेच्या तुलनेत निम्माच बीजपुरवठा बाजारात झाल्याने सोयाबीन बियाण्याची विविध जिल्ह्यात टंचाई भासत असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीन बियाण्याची टंचाई भासू नये यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना स्वतःकडील बियाणे वापरण्याचे आवाहन केले होते. पण बहुसंख्य शेतकऱ्यांकडे सोयाबीनच उपलब्ध नसल्याने कृषी केंद्रांसमोर शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे.

त्यात महाबीजचे सोयाबीन बियाणे यंदा नमुना चाचणीत मोठ्या प्रमाणात नापास झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऐन पीक काढणीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा सोयाबीनला फटका बसत आहे. परिणामी बियाण्याची गुणवत्ता ढासळत असल्याचे महाबीजच्या सूत्रांकडून सांगण्यात येते. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बियाणे कधी उपलब्ध होईल, याबाबत अजूनही माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे अनेक जण आता अधिकाऱ्यांना याबाबत माहिती विचारत आहेत. मात्र, त्यांच्याकडूनही समाधानकार उत्तर शेतकऱ्यांना मिळत नाही.

शेतकऱ्यांमध्ये नाराजी
गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या माथी बोगस सोयाबीन बियाणे मारणाऱ्या महाबीज या शासनाच्या महामंडळाला यंदा बियाण्याची उपलब्धता करून देता आली नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही, त्यांनी खासगी कंपनीचे महागडे बियाणे कसे विकत घ्यावे, असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत.

यंदा निम्मेच बियाणे बाजारात
महाबीजच्या माहितीनुसार बाजारातील एकूण बियाण्याची मागणी दरवर्षी सरासरी १२ ते १४ लाख क्विंटलची असते. यामध्ये सरासरी ४ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्याचा पुरवठा महाबीजकडून करण्यात येतो. मात्र, यंदा निम्माच म्हणजे २ लाख क्विंटल पुरवठा केला आहे. त्यामुळे टंचाई भासत आहे.

बातम्या आणखी आहेत...