आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्ग:महाराष्ट्रात कोरोनाचे 3 बळी; महापालिका रुग्णालयात लसीचा तुटवडा, पुण्यासह कल्याण - डोंबिवली, संभाजीनगरमध्ये ठणठणाट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात कोरोनामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 803 नवे रुग्ण आढळले आहेत. एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, दुसरीकडे पुणे, कल्याण - डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये लसीचा तुटवडा आहे. लस पुरवठा केव्हा होणार, असा सवाल नागरिक करत आहेत.

देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढ आहे. गेल्या 24 तासांत 6050 नवीन रुग्ण आढळले असून, 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांचा आकडाही 28 हजार 303 वर गेला आहे.

टाळेबंदीची आठवण

कोरोना रुग्णांची पुन्हा एकदा झपाट्याने संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिक धास्तावलेत. जुन्या टाळेबंदीच्या अनुभवाने अनेकांचा थरकाप उडतो आहे. बरेच ज्येष्ठ नागरिक आणि इतरही अनेक जण कोरोना लसीकरणासाठी धाव घेत आहेत. मात्र, त्यांना कोरोनाची लस संपल्याचे उत्तर मिळत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा आहे.

पुण्यात लसीकरण ठप्प

सध्या पुणे महापालिकेचे कोरोना लसीकरण बंद आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील लस साठा संपल्याने नागरिक वैतागलेत. कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि कोर्बेव्हॅक्स या तिन्ही लसी येथे मिळत नाहीत. तर कोव्हॅक्सिन लसीचे जवळपास 1000 डोसची एक्सपायरी डेट संपली आहे. जवळपास 1 एप्रिलपासून पुणे महापालिकेच्या रुग्णालयात लस नसल्याचे समजते. अजून आठ दिवस तरी येथे लस येण्याची शक्यता कमी आहे.

इतर ठिकाणीही तेच...

पुण्यास सह इतर अनेक ठिकाणच्याही लसी संपल्यात. त्यात मुंबई, कल्याण - डोंबिवली, छत्रपती संभाजीनगरमध्ये लस साठा संपला आहे. केंद्र सरकारकडून लसीचा साठा मिळत नसल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेकडे कोव्हॅक्सिनच्या 260 लसी होत्या. मात्र, या लसीची मुदत 31 मार्चला संपली. तर कोव्हॅक्सीन, कार्बोव्हॅक्स लसींचा साठा शिल्लक नाही. कोव्हॅक्सिन लसीचा साठा 24 मार्च, तर कोव्हिशिल्ड लसीचा साठा हा 10 फेब्रुवारीला संपला आहे.

संसर्गात वाढ

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या सकारात्मकता दर 3.32% आहे. मार्चच्या 31 दिवसांत कोरोनाचे 31,902 रुग्ण आढळले. त्या तुलनेत एप्रिलच्या 5 दिवसांतच 20,273 नवीन रुग्ण आढळले आहेत. मार्चमधील एकूण नवीन रुग्णांपैकी हे 63.5% आहे. सरासरी पाहिल्यास मार्चमध्ये दररोज सरासरी 1 हजार नवीन केसेस आढळून आल्या, तर एप्रिलमध्ये दररोज सरासरी 4 हजार केसेस समोर येत आहेत. संसर्गाचा दर असाच राहिला तर एप्रिलमध्ये 1.20 लाख नवीन रुग्णांची शक्यता आहे