आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन हा उपाय नाही हे मान्य आहे, आपण आरोग्य सुविधांमध्ये भरीव वाढ केली आहे, करतही आहोत. परंतु रुग्णवाढ पाहता आरोग्य सुविधा कमी पडतील की काय, अशी स्थिती आहे. आपण लॉकडाऊन टाळू शकतो. त्यासाठी जिद्दीने आणि स्वयंशिस्तीने सर्वांनी एकत्र येत पुन्हा एकदा हातात हात घालून कोरोनाविरुद्ध लढूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना केले.
दोन दिवसांत दृश्य परिणाम दिसले नाहीत तर तज्ज्ञ व संबंधितांशी चर्चा करून पर्यायांची माहिती घेऊन कडक निर्बंध जाहीर केले जातील, असा इशाराही त्यांनी दिला.ठाकरे म्हणाले, आज ५०० चाचणी प्रयोगशाळा आहेत. महाराष्ट्रात रोज १ लाख ८२ हजार चाचण्या होताहेत. एकही रुग्ण राज्यात लपवत नाही, लपवणार नाही, असे सांगून खाटा वाढवू, केंद्र वाढवू; परंतु डॉक्टर, नर्स कुठून आणणार? असा टोला मुख्यमंत्र्यांनी टीका करणाऱ्यांना लगावला.
हीच नव्हे, यापुढची कोरोना लाटही रोखू : मुख्यमंत्री
“आपल्याला जनतेचे जीव वाचवायचे आहेत. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतो आहे. मी दोन दिवस परिस्थिती बघेन. सर्व अधिकाऱ्यांकडून आढावा घेईन. राज्यात बदल दिसला नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्याबाबतचा इशारा देतो. त्यामुळे आतापासून आपण ठरवूया. आपण ही लाट रोखूच. याशिवाय यापुढची लाटही रोखूया”, असे मुख्यमंत्री म्हणाले.
“मधल्या काळात आपण गाफील झालो. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जिवाशी खेळ होईल असे राजकारण करू नका. सरकार जी पावले उचलत आहे ती जनतेच्या हितासाठी आहेत”, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
“अनेक देशांमधील परिस्थिती नाजूक आहे. या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद, सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी, अशी युरोपात परिस्थिती आहे. इटली, जर्मनीतही तीच अवस्था आहे. लॉकडाऊन घातक आहे. पण एका कात्रीत आपण सापडलो आहोत. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालू ठेवले तर अनर्थ घडतोय”, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. “आज ४५ हजार नवे रुग्ण वाढले आहेत. विलगीकरणात सध्या २ लाख २० हजार बेड्स आहेत. त्यापैकी १ लाख ३७ हजार बेड्स भरले गेले आहेत. म्हणजे ६५ टक्के बेड्स भरले आहेत. आयसीयू बेड्स हे २०५१९ आहेत. ते जवळपास ४८ टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड्स २५ टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहिली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील”, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणाले, लॉकडाऊन टळलेले नाही
- लॉकडाऊन करण्याची शक्यता पूर्णपणे टळलेली नाही.
- लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोना वाढला.
- अडीच लाख चाचण्या राज्यात रोज करणार, ७० टक्के आरटीपीसीआर चाचण्या असतील.
- पाचशे चाचण्यांची सेंटर उभारली आहेत, ५० हजार चाचण्या दर दिवसाला होत आहेत.
- महाराष्ट्रात ७५ हजार चाचण्या करण्याची क्षमता १ लाख ८२ हजार एवढी झाली आहे. पण अडीच लाख क्षमता करायची आहे.
- लस घेतल्यावरही काहीजण कोरोनाबधित होत आहेत. लस घेतल्यावरही काळजी गरजेची आहे.
- लॉकडाऊन टाळू शकतो, पण परिस्थिती बदलत चालली आहे. प्रत्येकानं ठरवलं पाहिजे मी कोरानाला हरवणार.
- राजकीय पक्षांना विनंती आहे, लोकांचा जीव जाईल असं वागू नका. जनतेच्या जिवाशी खेळणारे राजकारण करू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.