आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभर संचारबंदी:राेजी बंद...पण राेटी सुरू; आज रात्री 8 वाजेपासून ते 1 मे सकाळी 7 पर्यंत निर्बंध

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुर्बल घटकांच्या मदतीसाठी 5 हजार 476 कोटींचे पॅकेज

रोजी-रोटी महत्त्वाची आहे. पण रोजी-रोटीबरोबरच जीव वाचणेही महत्त्वाचे आहे, असे सांगतानाच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्री ८ वाजेपासून राज्यात लॉकडाऊनची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

१४ एप्रिल रात्री ८ ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू असेल. त्यामुळे पुढील १८ दिवस २४ तास संचारबंदी राहणार आहे. अनावश्यक येणे-जाणे पूर्णपणे बंद असेल. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरू राहतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेजही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. संचारबंदीची घोषणा करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती दिली.

राजकारण | उणीदुणी काढू नका; भाजपला सल्ला
कोरोनासंदर्भात उणीदुणी काढत बसू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले. आता जर उणीदुणी काढत बसलो तर महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही, सर्वांनी राजकारण बाजूला ठेवावे. हे फार मोठे संकट आहे. आपण याला साथ म्हणतो, त्याविरोधात साथ येऊन लढलो पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

७ कोटी लाभार्थींना ३ किलो गहू, २ किलो तांदूळ महिनाभर मोफत
एक महिना मोफत अन्नधान्य

अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थींना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे १ महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.

शिवभोजन थाळी मोफत : राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येईल. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.

निवृत्तिवेतन योजना लाभार्थींना आर्थिक साहाय्य
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तिवेतन योजना, अशा या पाच योजनांतील सुमारे ३५ लाख लाभार्थींना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य आगाऊ देण्यात येईल.

कोविडवरील सुविधा उभारणी
याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल.

- 05 लाख फेरीवाले प्रत्येकी रु. 1500 थेट खात्यात - 12 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगार, प्रत्येकी 1500रु. - 12 लाख रिक्षाचालकांना प्रत्येकी 1500 रुपये - 12 लाख आदिवासी, प्रति कुटुंब 2, 000 रुपये - याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी साहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली.

गुढीपाडव्याच्या शुभेच्छेने संबोधनाची सुरुवात

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन संबोधनाची सुरुवात केली. त्यानंतर ते म्हणाले की, मागच्यावर्षी अशाच शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी प्रार्थना केली होती, पुढचा गुढीपाडवा कोव्हिडमुक्त होऊदे. मधल्या काळात परिस्थिती तशी झाली होती. डिसेंबर-जानेवारीपर्यंत कोव्हिडवर नियंत्रण मिळवलं होतं. पण सध्या भयानक रुग्णवाढ होत आहे. आजचा रुग्णवाढीचा आकडा सर्वाधिक 60 हजार 212 नोंदवला आहे.

राज्यात सध्या 523 कोरोना चाचणी केंद्रे

ते पुढे म्हणाले, मागच्या वर्षी कोरोना चाचणी केंद्र 1-2 होते, पण आता 523 केंद्र आहेत. पण, चाचण्यांचे रिपोर्ट येण्यास वेळ लागत आहे. यंत्रणावर भार आलाय. यंत्रणांची क्षमता असते, रोज चाचण्यांची संख्या वाढवतोय. 85 हजारावरुन सव्वा दोन लाख चाचण्या होत आहेत. कोव्हिड सेंटर 2600 होती, ती आता 4 हजारावर गेलेत.

ऑक्सीजन देण्याची केंद्राकडे विनंती

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, अशा कठीण काळात मी सर्वांशी चर्चा करतोय, पण निष्पन्न काहीच होत नाहीय. सध्याचा जो काळ आहे, ही परिस्थिती हातातून गेली तर नंतर काहीच होणार नाही. सध्या 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होते. हा आरोग्यासाठीच वापरला जातो. आज 950 मेट्रिक टन ऑक्सिजन वापरला जातोय. औषधे जिथून मिळतील तिथून घेतोय. केंद्राकडे विनंती केली. रोजच्या रोज त्यांच्याकडे अहवाल जात आहे. एकही मृत्यू किंवा रुग्ण लपवत नाहीत. सर्व परिस्थितीला तोंड देतोय. त्यामुळे पंतप्रधानांना ऑक्सिजन देण्याची विनंती केली. त्यांच्या क्षमतेप्रमाणे ऑक्सिजन पुरवठा सुरु झाला आहे. अधिकचा ऑक्सिजन इतर राज्यातून देण्यासाठी परवानगी मागितली आहे. ईशान्येकडील राज्यातून परवानगी दिलीय, ती हजारो किमीवर आहेत.

ते पुढे म्हणाले, सध्या राज्यातील परिस्थिती अत्यंत कठीण आहे. पंतप्रधानांनी टीका महोत्सव करा म्हटले, मी म्हणतो फक्त चार दिवस कशाला, अनेक दिवस करू. आम्ही लसीकरण वाढवत आहोत. आताची लाट मोठी आहे. लसीकरणानंतर लगेच प्रतिकारशक्ती येत नाही. पुढची लाट येण्यापूर्वी लसीकरण आवश्यक आहे. येत्या काळात ब्रिटनप्रमाणे लसीकरण प्रचंड वाढवावा लागेल. पहिली लाट ही काहीच नव्हती. दुसरी लाट भयानक आहे. त्यामुळे तिसरी लाट कशी असेल सांगता येत नाही.

राज्यात ऑक्सीजनची कमतरता आहे. रस्त्याने ऑक्सिजन आणणे कठीण आहे. हवाई मार्गे ऑक्सिजन मिळत असेल तर ती परवानगी देऊन एअरफोर्सने ऑक्सिजन पाठवा, अशी केंद्राला विनंती केली आहे. ऑक्सिजन, औषधांची कमतरता जाणवतेय. येत्या काळात आरोग्य व्यवस्था पुन्हा वाढवतोय. जिथे जिथे आवश्यक तिथे व्यवस्था वाढवणार आहोत. आरोग्य व्यवस्था वाढवतोय पण हे एकतर्फी आहे. कारण आरोग्य व्यवस्था वाढले तरी डॉक्टर हवेत. जे नवे उत्तीर्ण झालेले डॉक्टर आहेत, त्यांना आवाहन करतोय, निवृत्त डॉक्टर, परिचारिकांना महाराष्ट्राच्या लढाईत सहभागी व्हा.

बातम्या आणखी आहेत...