आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. ही रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे अनेक शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. जाणून घ्या या शहरांमध्ये सध्याची परिस्थिती काय आहे.
मुंबई
मुंबई महापालिकेने रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी नियम कडक केले असून मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई अधिक कडक केली आहे. रुग्णसंख्या वाढीमागे नागरिकांचा हलगर्जीपणाही असल्याने प्रशासनासोबत आपणही आपली काळजी आणि खबरदारी घेणे गरजेचे आहे. मागील दोन दिवसांपासून महापालिकेकडून रेस्टॉरन्ट्स बार आणि हॉटेल्सवर कारवाई धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे.
पुणे
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत.
औरंगाबाद
तीन महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी मिळाली होती. मात्र, आता रुग्णसंख्या वाढत चालल्याने ती परवानगी रद्द करण्यात आली असून रुग्णांना थेट मनपाच्या कोविड सेंटरमध्येच भरती व्हावे लागणार आहे. मेल्ट्रॉन (३०० रुग्ण), पदमपुरा कोविड सेंटर (५०) पूर्ण क्षमतेने भरले आहे. म्हणून ४०० रुग्ण क्षमतेचे किलेअर्क, एमजीएम येथील सेंटर पुन्हा सुरू केल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.शहरातील सर्वच मंगल कार्यालये आणि स्मशानभूमीच्या दर्शनी भागात ‘मास्कशिवाय प्रवेश नाही’ असे फलक लावले आहेत.
नाशिक
गेल्या पाच-सहा दिवसात सातत्याने काेराेनाचे रुग्ण वाढत असताना किंबहुना शुक्रवारी सायंकाळपर्यंत अॅक्टिव्ह रुग्णसंख्या ९०० च्या घरात गेल्यानंतर महापालिका अायुक्त कैलास जाधव यांनी अॅक्शन माेडवर येत जेथे रुग्ण सापडेल तेथे विभागीय अधिकारी व अाराेग्य विभागाच्या नाेडल अाॅफिसरने प्रत्यक्ष भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्र करण्यापासून ते काेराेना नियंत्रणासाठी अावश्यक नियमांची अंमलबजावणी करण्याचे अादेश जारी केले अाहेत. सध्या ८० टक्के रुग्ण घरगुती विलगीकरण अर्थातच हाेम अायसाेलेशनला पसंती देत असल्यामुळे गरज पडली तर मुक्तिधाम तसेच समाजकल्याण येथील काेविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू केले जाणार अाहे. मुख्य म्हणजे, काेराेनाचा प्रसार फॅमिली टू फॅमिली हाेत असल्याचे समाेर अाले असून पिंपळनेर (सटाणा) येथील लग्नासाठी अालेल्या २३ जणांना काेराेनाची लागण झाल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी पालिका कारवाई करणार अाहे.
जळगाव
कोरोना रुग्ण वाढीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर अनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तयारी पूर्ण झाली असून कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्ही पद्धतीचे नियोजन करण्यात आले. जीएमसीत सोमवारपासून ओपीडी दरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी पाच-पाच रुग्णांनाच आत प्रवेश दिला जाणार असून कोविडची लक्षणे आढळ्यास त्यांची तपासणी करण्यात येईल. कोरोनाची स्वतंत्र स्क्रीनिंग करण्यात येईल, अशी माहिती अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. शुक्रवारी जिल्ह्यात १५४ रुग्ण आल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यांनी कोरोनाच्या रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला. कोविड आणि नॉन कोविड डॉक्टरांची टीम वेगळी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. यात सध्या अत्यावश्यक असेल तरच रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या. तसेच सर्व डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून जे डॉक्टर सध्या सुटीवर आहेत त्यांना पत्र पाठवून तत्काळ रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरात नो मास्क नो एन्ट्री’ नियम पाळण्याबाबत सांगण्यात आले. सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
अकाेला
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या असून, शनिवारी २० फेब्रुवारीला रात्री ८ वाजता संचारबंदीला प्रारंभ झाला. टाळेबंदी साेमवारी २२ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजेपर्यंत राहणार अाहे. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाेलिस, महसूल, मनपा प्रशासनाकडून कठाेर उपाय याेजना करण्यास प्रारंभ झाला. मुख्य बाजारपेठ रात्री ८ वाजेपूर्वीच बंद करण्यात अाली. मात्र गल्लीतील दुकाने ९ नंतरही सुरुच हाेती. अनेक िठकाणी नागरिकांचा िवना मास्क वावर असून, िफजिकल डिस्टन्सिंगचे (संसर्ग टाळण्यासाठी विशिष्ट अंतर ठेवणे) पालन हाेताना िदसत नाही. त्यामुळे प्रशासनाने प्रत्येक रविवारी संचारबंदीची घाेषणा केली असून, शनिवारी रात्रीपासून अंमलबजावणीला प्रारंभ झाला. संत तुकाराम चाैक, काैलखेड चाैक, गाैरक्षण राेड, खदान, जुने शहरातील दुकाने बंद करण्यास सुरुवात करण्यात अाली. मात्र राऊत वाडी, जवाहर नगर चाैक, द्वारका नगरी परिसरातील दुकाने ८.३० नंतरही सुरु हाेती.
अमरावती
गेल्या आठवडाभरापासून अगदी सुसाट धावणारा कोरोना थांबण्याचे नावच घेत नसून, शनिवारी पुन्हा ७२७ ही विक्रमी संख्या बाहेर आली आहे. या नव्या संख्येमुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या २८ हजार ८१५ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात सात जणांचा मृत्यू ओढवला. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री ८ वाजेपासून ३६ तासांचा लॉकडाऊन सुरु झाला असून, उद्या, रविवारी संपूर्ण दिवसभर दळणवळण बंद राहणार आहे. दुसरीकडे रुग्णसंख्या जास्त असलेल्या परिसरांची चाचपणी सुुरु झाली असून उद्या त्या भागात कन्टोन्मेंट झोनही तयार केले जाणार आहे.
अहमदनगर
कोरोना पूर्णतः नष्ट झालेला नाही. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी झाल्याने पुन्हा मास्क न लावणे, गर्दी करणे, असे प्रकार होत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचे असेल तर जिल्ह्यातील नागरिकांनी मास्क लावा, सोशल डिस्टंसिंग पाळा, कोणी नियमांचे पालन करत नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा’, अशा सूचना प्रशासनाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत. राज्यभरात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सवर चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विदर्भातील अमरावती, वर्धा तसेच पुणे, मुंबई परिसरात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही गेल्या महिनाभरापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रदीर्घ आढावा बैठक घेतली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.