आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maharashtra Corona News And Updates, Lockdown , Weekend Lockdown In Maharashtra From Tomorrow, Strict Restrictions On Saturday Sunday

ब्रेक दि चेन:औरंगाबादच्या धर्तीवर राज्यात अखेर वीकेंड लाॅकडाऊन! राज्य मंत्रिमंडळाच्या तातडीच्या बैठकीत निर्णय

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगी कार्यालयांना घरूनच काम, केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु
  • अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी
  • मुख्यमंत्र्यांचे सहकार्याचे आवाहन, विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले

औरंगाबादच्या धर्तीवर राज्यभरात अंशत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सोमवार, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून ते ३० एप्रिलपर्यंत या निर्बंधांची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये दररोज रात्री ८ ते सकाळी ७ वाजपेर्यंत संचारबंदी आणि दिवसा गर्दी होऊ नये याकरिता जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. यापुढे या आदेशांना ‘मिशन बिगिन अगेन’ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येईल.

हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील, मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणे बंद राहतील.

आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्री ८ वाजेपासून ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत असा दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार आहे. दरम्यान, वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत विरोधी पक्षांसह उद्योगपती, माॅल, चित्रपटगृहांचे मालक, चित्रपट, नाट्य निर्माते, जिमचालक आदींशी चर्चा केली होती. सर्वांनीच सहकार्य करण्याची तयारी दर्शवली,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

वाहतूक सुरू, जिल्हा बंदी नाही : दरम्यान, राज्यातील सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सुरुच राहणार आहे. बस, रिक्षा, टॅक्सी सुरू राहणार, पण त्यांच्या प्रवासी क्षमतेवर बंधन असून रिक्षामध्ये १ आणि दोन पॅसेंजर, म्हणजे ५० टक्के क्षमतेने सर्व वाहने सुरू राहतील. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातही प्रवास करण्यास मुभा आहे. जिल्हाबंदी नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मुंबईतही लोकल सुुरू राहणार आहेत.

मोदींनी बनवली पंचसूत्री रणनीती : कोरोनावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत १० राज्यांमधील ९१ टक्के रुग्णसंख्या व मृत्यू यावर पंतप्रधानांन मोदींनी चिंता व्यक्त केली. तसेच कोरोना नियंत्रणासाठी मोदींनी पंचसूत्री रणनीतीचा अवलंब करण्यास सांगितले. यात टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोरोनाप्रमाणे त्यावर उपचार आणि लसीकरणावर जोर द्यावा अशी सूचना केली. या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास कोरोनाला प्रभावीपणे रोखणे शक्य होईल. यासाठी ६ ते १४ एप्रिल या कालावधीत विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. यामध्ये मास्क लावणे बंधनकारक तसेच हात धुणे आणि फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे महत्व लोकांना पटवून दिले जाईल.

आजारी कामगारास रजा : बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. कोरोनामुळे कोणत्याही कामगारास काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यावी लागणार आहे.

हॉटेल्स, बार, कटिंग सलून बंद
- उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
- चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडिओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
- उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागतांसाठीच सुरू ठेवता येईल, मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.
- सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे दर्शनार्थींसाठी बंद राहतील. मात्र या ठिकाणी काम करणाऱ्यांना दैनंदिन पूजाअर्चा करता येईल.
- सर्व कटिंग सलून्स, ब्यूटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनीदेखील लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे.
- शाळा-महाविद्यालये बंद राहतील, मात्र १० व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

उद्योग, बांधकाम, शेतीची कामे सुरू
- उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
- लग्नसोहळ्यासाठी ५० जणांची मर्यादा, तर अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांना परवानगी.
- वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल, मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करावे
- शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील.
- किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील.
- सार्वजनिक व खासगी वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये सीटनुसार ५० टक्के प्रवाशांना मुभा.
- बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा कार्यालये सुरू राहतील.
- शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहील. अभ्यागतांना प्रवेश नसेल.
- ई-कॉमर्स सेवा सकाळी ७ ते रात्री ८ सुरू राहील.

खाद्यविक्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्यविक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. मात्र नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

सोसायटी मिनी कंटेनमेंट : ५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत ‘मिनी कंटेनमेंट’ म्हणून घोषित करणार. तसा फलक लावण्यात येईल. बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी असेल.

विदर्भात ८,३५३ नवे रुग्ण, ८९ मृत्यूंची नोंद
अमरावती | विदर्भात रविवारी ८३५३ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ८९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पूर्व विदर्भातील ६९ जणांपैकी नागपूरच्या ६२ तसेच चंद्रपूर व वर्धा येथील प्रत्येकी ३, तर भंडारा येथील एकाचा समावेश अाहे. तसेच पश्चिम विदर्भात कोरोनामुळे २० जणांचा मृत्यू झाला असून यात यवतमाळ ८, बुलडाणा ६, वाशीम ३, अकाेल्यातील २, तर अमरावती येथील एकाचा समावेश अाहे.

मराठवाड्यात ५,२९४ कोरोनाबाधित, ८५ मृत्यू
औरंगाबाद | मराठवाड्यात रविवारी ५,२९४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ८ ५ बाधितांचा मृत्यू झाला. रविवारी औरंगाबादेत सर्वाधिक १५०८, नांदेड ११८६, लातूर ६८५, जालना ५६७, परभणी ५२२, हिंगोली ८८, उस्मानाबाद २५२, बीड ४८६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर ८५ मृतांमध्ये औरंगाबाद ३०, नांदेड २७, लातूर १०, परभणी ८, जालना, बीडमध्ये प्रत्येकी ४, हिंगोली २ जणांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...