आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर:महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री म्हणाले- दुसरा पर्याय नाही, दोन दिवसात निर्णय घेऊ

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कडक लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन केला जाऊ शकतो. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या संदर्भात निर्णय घेण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. यात सर्वांची मते जाणून घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यींनी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याचे संकेत दिले आहेत. 'यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये, निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ', असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरु झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अशा अनेक नेत्यांची उपस्थिती आहे.

लॉकडाऊनवर एकमताने निर्णय घेऊ- उद्धव ठाकरे
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, 'कोरोना लसीचा दुसरा डोस देऊनही लोक पॉझिटिव्ह होत आहेत. हा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडला होता. सध्या कोरोनाची साखळी तोडणं आणि आरोग्य सुविधा वाढवणं गरजेचं आहे. लॉकडाऊनबाबत निर्णय घ्यायचा झाल्यास तो एकमताने घेतला गेला पाहिजे. कालच निर्णय झाला असता पण देवेंद्रजी आपण नव्हता म्हणून आजची ही बैठक बोलावली आहे. लॉकडाऊन लावल्यास महिन्याभराच्या आत आपण परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो. पण एकमत झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, कोरोना हा रोगच नाही असा गैरसमज पसरवला जात आहे. पण, अशा लोकांची चर्चा करायला नको. सध्या कोरोनाचा गुणाकार थांबवला पाहिजे. किती आरोग्य सुविधा वाढवू शकू याचा विचार झाला पाहिजे. दोन डोस घेऊन सुद्धा अजून माझ्या शरिरात अँटी बॉडी तयार झाल्या नाहीत, यावरुन हा आजार किती भयंकर आहे, हे समजते.

तज्ज्ञांच्या मते 14 दिवस लॉकडाऊन आवश्यक

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, लॉकडाऊनबाबत तज्ज्ञांचे मत घेण्यात आले, त्यांनी 14 दिवसांचे लॉकडाऊन असावे मत व्यक्त केले आहे. लॉकडाऊनबाबत अनेक चांगल्या सूचना आल्या आहेत, मी त्याची नोंद घेतली आहे. कडक निर्बंध हवेत आणि सूटही पाहिजे हे दोन्ही गोष्ट एकत्र शक्य नाही. आता तरी आपल्याला कडक निर्बंध करुन थोडी कळ सोसावी लागेल. मी व्यापऱ्यांशी बोललो. होम डिलिव्हरी, टेक अवेला दोन तीन दिवस लागतील. सुरुवातीला कडक निर्बंध लावू. 8 दिवस

लॉकडाऊन हाच उपाय आहे , असे मत त्याांनी मांडले.

कडक लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल- देवेंद्र फडणवीस

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोना रुग्ण वाढत आहेत, यासाठी निर्बंध असायला हवे. पण, कडक लॉकडाऊन केला तर जनतेचा उद्रेक होईल. आपण, जनतेचा उद्रेक लक्षात घेतला पाहिजे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा - अजित पवार

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सर्वांचे म्हणणे ऐकूण जो निर्णय घ्याचा आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी घ्यावा, आमचे सहकार्य असेल. ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. रेमडीसीविरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काळाबाजार थांबवायला आपण यशस्वी झाले पाहिजे. पुणे शहरात, पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात एक आठवडा राज्यासाठी जो निर्णय घेतला जाईल तो लागू करू नये, तो स्थानिक प्रशासनच्या स्तरावर निर्णय घेऊ.

भाजपने राजकारण थांबवावे- नाना पटोले

यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, 'सध्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राथमिकता द्यायला हवी. हातावर पोट असणाऱ्यांचा विचार करावा लागेल. मृत्यू थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय करा, वेळप्रसंगी कटू निर्णय घ्यावे लागले तरी तो स्वीकारायला हवा.कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक, मात्र विरोधक अजूनही राजकारण करत आहे. आधी मदत मग लॉकडाऊन असे विरोधकांचे म्हणणे आहे. आता ताटं आणि दीवे पेटवण्याची वेळ नाही, तर जीव वाचवणे आवश्यक आहे, असे पटोले म्हणाले.

गुजरातमधून रेमडेसिव्हीरचा साठा घ्यावा- बाळासाहेब थोरात

'राज्यात कटू निर्णयाची अंमलबजावणी केली तर कोरोनाची साखळी तुटेल, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, गुजरातमधून रेमडेसिव्हीरचा साठा मिळू शकला तर पाहावा. देवेंद्र फडणवीसही या बैठकीला उपस्थित आहेत.

मध्यबिंदू काढा- अशोक चव्हाण

यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मध्यबिंदू काढण्याचा मार्ग सुचवला. ते म्हणाले की, आव्हानात्मक परिस्थिती आहे. लॉकडाऊन किंवा निर्बंध लावायचे असतील तर गरिबांचंही नुकसान होणार नाही अशी व्यवस्था करावी लागेल. पूर्ण लॉकडाऊनही नको आणि सर्व सुरु नको, मध्यबिंदू साध्य करायला हवा.

राज ठाकरेंची बैठकीला अनुपस्थिती​​​​​
मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. त्यांच्यावर आज रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहे. यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात अॅडमिट आहेत.

बातम्या आणखी आहेत...