आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉकडाऊनला विरोध:जनतेच्या रोषानंतर कोल्हापुरातील कडक लॉकडाऊनचा निर्णय आठ तासात मागे; आजपासून जनता कर्फ्यु

काेल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेराेना रुग्णांचे वाढते प्रमाण राेखण्यासाठी दक्षिण अन् पश्चिम महाराष्ट्रात कठाेर उपाययाेजना

राज्यातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या राेखण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संपूर्ण राज्यात १५ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले अाहेत. सरकारच्या या उपाययाेजनांनंतरही राज्याच्या काही शहरांमध्ये काेराेना रुग्णांची संख्या दिवसाला हजाराचा अाकडा अाेलांडत अाहे. सातारा, सांगली, बारामती या शहरात कडक लाॅकडाऊनची घाेषणा अगाेदरच झाली अाहे. काेल्हापूर जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या अाणि त्या प्रमाणात प्राणवायू अाणि रेमडेसिविरचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेऊत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेऊन ५ मेपासून १० दिवसांचा कडक लाॅकडाऊन जाहीर केला हाेता. परंतु या निर्णयाविराेधात स्थानिक लाेकांमध्ये निर्माण झालेला संताप अाणि साेशल मिडियावर व्यक्त झालेला निषेध लक्षात घेता लाॅकडाऊनचा निर्णय ८ तासात मागे घेऊन अाता त्याएेवजी जनता कर्फ्यु करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.

काेल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या ऑक्सिजनची गरज वाढत चालली आहे. रुग्णसंख्या आणखी वाढत राहिली तर ऑक्सिजनची अधिक गरज लागेल. वाढती रुग्णसंख्येची साखळी तोडण्यासाठी बुधवार, ५ मे राजी सकाळी ११ वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करण्याची घाेषणा ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी सकाळी झालेल्या बैठकीत केली हाेती. सर्वोच्च न्यायालयानेही लॉकडाऊनचा पर्याय सुचवला आहे. रुग्णसंख्या थांबववण्यासाठी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे मुश्रीफ यांनी या वेळी स्पष्ट केल हाेते. पण संध्याकाळी उशीरा लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेण्यात अाला. पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे या बैठकीत सहभागी झाले होते.

लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सूट देऊन लॉकडाऊन कडकडीत करावा, अशी सूचना अाराेग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी केल हाेती तर पालकमंत्री सतेज पाटील यांनी रुग्णसंख्येची वाढती साखळी तोडण्यासाठी उद्या वाजल्यापासून जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन करावा असे म्हटले हाेते.

जिल्ह्यात २,४०० रुग्ण अाॅक्सिजनवर : काेल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस रुग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी झालेला नाही. जिल्ह्यात २,४०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्ह्यातून पुरवला जात असल्याचे यड्रावकर यांनी यावेळी बाेलताना सांगितले.

सातारा : लॉकडाऊनची अंमलबजावणी

सातारा जिल्ह्यात ४ मे राेजी सकाळी ७ वाजल्यापासून ते १० मेपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लागू असलेले निर्बंध कडक करणे गरजेचे असल्याची माहिती प्रभारी जिल्हा दंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे.

दुकाने बंद पण घरपाेच सेवा सुरू : जिल्ह्यातील सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्यपदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडित दुकाने पूर्णपणे बंद राहतील. पण या दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी देण्यात अाली अाहे. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते ११ या कालावधीतच चालू राहतील. पण या दुकानांची घरपोच सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी देण्यात अाली अाहे. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी १२ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील. सांगलीत ऑक्सिजनचा तुटवडा, बारामतीमध्ये भाजीपाला विक्रीस मनाई, केवळ दूध विक्रीची मुभा

सांगली : अाज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी
कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत आठ दिवसांचा तातडीचा लॉकडाऊन जाहीर करण्याची घाेषणा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. आपल्या सर्वांचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे भावनिक आवाहनही त्यांनी ट्वीट करून केले अाहे. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १ हजार ५६८ वर पोहोचली असून काल(सोमवारी) ४० रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन सांगली जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
सांगलीला ऑक्सिजन काठावर : सांगली जिल्ह्याला ऑक्सिजन काठावर मिळतोय, प्रचंड ताकद खर्च करून बाहेरून ऑक्सिजन मिळवावा लागत आहे. औषधांबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत म्हणून ही शृंखला मोडण्यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे होते. जीवनावश्यक वस्तूंपेक्षा आपल्या सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. तुम्हा सगळ्यांच्या मदतीनेच आपल्याला कोरोनावर मात करायची आहे. त्यामुळे घरीच राहा, सुरक्षित राहा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले अाहे.

कोरोनामुळे आईचा मृत्यू, नाशकात तरुणीची सॅनिटायझर घेऊन आत्महत्या

कोरोनामुळे आईचा मृत्यू झाल्याचा धक्का असह्य झाल्याने रविवारी (दि. २) येथील कोविड सेंटरच्या आवारातच २० वर्षीय तरुणीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. २९ एप्रिलला जयाबाई लक्ष्मण भुजबळ या कोरोनाबाधित झाल्याने त्यांच्यावर नाशिक रोड येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू करण्यात आले. मुलगी शिवानी आईची देखभाल करत होती. मात्र, रविवारी जयाबाई यांचा मृत्यू झाला. शिवानीला हा धक्का सहन झाला नाही. जवळ असलेले सॅनिटायझर घेऊन रुग्णालयाबाहेर येत तिने ते पिऊन घेतले.

बारामती : ११ मेपर्यंत लाॅकडाऊन
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५ मेपासून बारामतीमध्येही लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. ११ मेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या काळात सकाळी ७ ते ९वाजेपर्यंत फक्त दूधविक्रीला परवानगी असेल. औषधांची दुकाने आणि हॉस्पिटल्स वगळता इतर सगळी दुकाने, भाजी मंडई या काळात बंद राहतील.

लातूरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करणार : देशमुख

कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी आज ॲलोपॅथीचा प्रामुख्याने उपयोग करण्यात येत आहे. पण येत्या काळात लातूर जिल्ह्यात आयुषच्या सर्व डॉक्टरांना एकत्र करून पहिले कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांंनी आयुष टास्क फोर्सच्या सदस्यांसमवेत झालेल्या अाॅनलाइन संवादात माहिती देताना सांगितले. वर्षभरापासून अधिक काळ कोविड संकटाशी आपण सामना करत असून अजूनही रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही. यामुळेच कोविड केअर सेंटरमध्ये आयुषअंतर्गत येणाऱ्या पॅथीचा उपयोग रुग्णांसाठी करून एक पायलट सेंटर लातूरमध्ये सुरू करण्याचा प्रयत्न आहे. सध्याच्या काळात कोविड रुग्णांची संख्या तातडीने कमी करणे आवश्यक आहे. कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीमार्फत उपचार देता येऊ शकतात. त्यासाठी एसओपी तयार करण्याचे काम आयुष संचालनालयामार्फत करण्यात यावे, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...