आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्यात एकूण रुग्णसंख्येला सातत्याने ओहोटी लागली अाहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबादसारख्या महानगरांमध्ये रुग्णसंख्येत घट नोंदवली जात असताना दुसरीकडे मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोलीसह राज्यातील छोट्या व ग्रामीण भाग असलेल्या १६ जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून केंद्राकडे २०० टन जादा अॉक्सिजनची मागणी करण्यात आली आहे. या १६ जिल्ह्यांपैकी बीड, सांगली, सातारा, कोल्हापूर शहरांमध्ये कडकडीत लॉकडाऊनचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत.
दरम्यान, राज्यात गेले तीन आठवडे दैनंदिन ६० हजारांच्या वरती कोरोना रुग्ण आढळत होते. लॉकडाऊनच्या तिसऱ्या आठवड्यानंतर मात्र दैनंदिन ५० हजारांच्या आत रुग्णसंख्या नोंदली जात असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह राज्यातील १२ मोठ्या शहरांमध्ये रुग्णसंख्या घटत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१६ जिल्ह्यांसाठी २०० टन अतिरिक्त ऑक्सिजन, वाहतुकीसाठी १० टँकर्सची केंद्राकडे मागणी
महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचीदेखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे. राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २४ हजार ७८७ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. सध्या जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रिक ऑक्सिजन पुरवठा होत असू त्यात १०० मेट्रिक टनांनी वाढ करून दिवसाला २२५ मेट्रिक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रिक टन पुरवठा व्हावा.भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कालावधी कमी होण्यास मदत होईल, असे पत्रात म्हटले अाहे.
संसर्गाचा दर २७ वरून २२ टक्के, बरे होण्याचा दर ८४ टक्क्यांवर
संसर्गाचा दर तीन आठवड्यांपूर्वी २७ टक्के होता. तो २२ टक्के झाला असून ५ टक्के घट दिलासादायक आहे. कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केले नाही. दैनंदिन अडीच ते २ लाख ८० हजार चाचण्या केल्या जात आहेत. यात ६२ टक्के आरटीपीसीआर चाचण्या असून ३५ टक्के अँटिजन आहेत. रुग्णालयांत आजमितीस दैनंदिन ४८ हजार रुग्ण भरती होत असून ५९ हजार रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले जात आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ८४.७ टक्के आहे, तोच देशाचा हा दर ८१ टक्के असल्याचे टोपे यांनी सांगितले. साडेतीन लाख रेमडेसिविर, ४० हजार आॅक्सिजन काॅन्सन्ट्रेटर आणि २५ हजार टन आॅक्सिजन खरेदी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय निविदा काढल्या आहेत. आॅक्सिजन आपत्कालीन साठा करण्यासाठी २७ टँक खरेदी करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य आॅक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण असेल, असा दावा टोपे यांनी केला.
१ कोटी ६५ लाख लसीकरण : ४५ वयापुढील १ कोटी ६५ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. सीरमला १३ लाख ४५ हजार तर भारत बायोटेककडे ४ लाख ७९ हजार अशा १८ लाख लस मात्रांची नोंदणी केली आहे. मंगळवारी आपल्याला केंद्राकडून ९ लाख मात्रा मिळाल्या, मात्र त्या दोनच दिवस पुरतील. महाराष्ट्राला ८ लाख दैनंदिन लस मात्रांची गरज आहे, पण फक्त २५ हजार मात्रा केंद्राकडून मिळतात,असे टोपे म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.