आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

गणेशोत्सव 2020:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या मार्गदर्शक सूचना, सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती गणपतीकरिता 2 फूटांची मर्यादा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारनं आज जारी केल्या. त्यानुसार घरगुती गणपतीच्या मूर्तीवर दोन फुटांची मर्यादा घालण्यात आली आहे. यासोबतच, गर्दीमुळं होणारा संसर्ग टाळण्यासाठी विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून घेण्याच्या सूचना गणेशभक्तांना करण्यात आल्या आहेत. तसे सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांवर लक्ष केंद्रीत करण्याचे अवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. 

सरकारच्या मार्गदर्शक सूचना 

  1. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी मंडळांना महापालिका व स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार आवश्यक परवानग्या घेणे आवश्यक असणार आहे. 
  2. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता उत्सवाचे मंडप हे न्यायालयाचे आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत असावे. सजावट करताना भपकेबाजी नसावी.
  3. श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती गणपतीकरिता 2 फूटांच्या मर्यादेत असावी.
  4. शक्य असल्यास घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो तो घरीच करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. गणशेमुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे.
  5. सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने मिळत असल्यास घ्यावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. जाहिराती आरोग्यविषयक किंवा सामाजिक संदेश देणाऱ्या असतील हे पाहावे.
  6. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रम किंवा रक्तदान शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे. त्याद्वारे  कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता जनजागृती करण्यात यावी.
  7. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे.
  8. श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाइन, केबल, फेसबुक व वेबसाइटद्वारे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी.
  9. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रिनिंगची पुरेशी व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे नियम पाळतील याकडे विशेष लक्ष द्यावे. 
  10. गणेशाचे आगमन व विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करण्यात यावी. विसर्जन स्थळी कमी वेळ थांबावे. लहानमुले आणि वरिष्ठांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे.
  11. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
  12. राज्य सरकारच्या संबंधित विभागांनी तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचेदेखील अनुपालन करावे. 
0