आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक ठिकाणी मोडीत निघालेली अविरोध निवडणुकीची परंपरा, लिलाव बोली अशा कारणांमुळे कधी नव्हे एवढ्या उत्कंठावर्धक ठरलेल्या राज्यातील १२,७११ ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात स्थानिक पातळीवरील आघाड्यांनी लक्षणीय यश मिळवले. पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढवली गेली नसली तरी विविध राजकीय पक्ष व प्रमुख नेत्यांच्या प्रभाव क्षेत्रातील एकुणातले कल पाहता शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या सत्ताधारी महाविकास आघाडीला ग्रामीण महाराष्ट्राने झुकते माप दिल्याचे चित्र दिसून येते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठराविक ‘पॉकेट्स’मध्ये मिळालेल्या मर्यादित यशावर समाधान मानावे लागले आहे. राज्यात तब्बल १४,२३४ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. पैकी अनेक ठिकाणी निवडणूक अविरोध होऊन २६,७१८ उमेदवार अगाेदरच विजयी घाेषित झाले होते. निवडणूक अविरोध होण्यासाठी लिलाव बोली लावण्याच्या कारणावरून नाशिक जिल्ह्यातील उमराणे व नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी गावच्या निवडणुका रद्दबातल ठरवल्या गेल्या होत्या. उर्वरित १२,७११ ग्रामपंचायतींत झालेल्या मतदानाची मोजणी सोमवारी शांततेत पार पडली. निकाल हाती येऊ लागले तसे राजकीय पटलावर त्याचे तरंग उठण्यास सुरुवात झाली. गावागावात बहुमत आम्हालाच असे दावे-प्रतिदावे सर्व प्रमुख पक्षांकडून करण्यात येत असले तरी एकुणातले चित्र असे आहे...
महाविकास आघाडीच्या गढीवर
> काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाणांच्या बारडमध्ये शिवसेनेचा जोरदार धक्का, १७ पैकी १६ जागांवर सेनेचा भगवा.
> जलसंधारणमंत्री जयंत पाटलांच्या मेहुण्यांना म्हैसाळमध्ये भाजपचा धक्का.
> संगमनेरमध्ये थोरात विरुद्ध विखेंचे परस्परांना चेकमेट, परस्परांकडील कळीच्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर.
> छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा.
> सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचे परळीतील १२ पैकी १० ग्रामपंचायतींवर वर्चस्व.
> पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्वे व शेणाेली भाजपकडे.
> अन्न व औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजाचा गड राखला.
> महिला व बालविकासमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मोझरी गाव राखले, पण मतदारसंघात संमिश्र चित्र.
> गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १८ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा फडकवला.
> पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी पाटणसावंगीची ग्रामपंचायत राखली.
> कोल्हापूरच्या शाहूवाडीत शिवसेनेची मुसंडी, जनसुराज्य व काँग्रेसचे पानिपत.
> रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व, ४७९ पैकी ३१६ ग्रामपंचायती सेनेकडे.
> राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पलूस तालुक्यात काँग्रेसला तारले.
> आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी पाथरवाला ग्रामपंचायतीचा गड राखला.
> एकनाथ खडसेंच्या काेथळी गावात शिवसेनेचा दणका.
भाजपच्या चावडीवर...
> भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर ग्रामपंचायतीत शिवसेनेचा डंका.
> माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी गमावली, मात्र परिसरातील २५ पैकी २४ ग्रामपंचायतींवर वर्चस्व.
> माजी मंत्री राम शिंदेंच्या चौंडी गावात राष्ट्रवादीच्या रोहित पवार गटाचा विजय.
> सिंधुदुर्गात राणेंचेच वर्चस्व, भाजपकडे ४३ ग्रामपंचायती तर सेनेकडे २३ ग्रामपंचायती.
> सावंतवाडीतील दांडेली ग्रामपंचायत सेनेकडून खेचून घेण्यात भाजपच्या आशिष शेलारांना यश
> जामनेरमध्ये गिरीश महाजनांनी राखली सत्ता.
> केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांच्या पळसाे बढेत भाजपचे १३ पैकी फक्त ३ सदस्य विजयी.
> माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडेनी वरुड-मोर्शी मतदारसंघात बहुमत राखले.
> माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गटाने कोराडी ग्रामपंचायत राखली.
> माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची निमगाव केतकी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात.
> मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची मुसंडी, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना धोका.
राळेगणमध्ये अण्णांचा आशीर्वाद फळाला
निवडणुकीस कारणीभूत किसन पठारे यांच्यासह सातही उमेदवारांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सहानुभूती लाभलेले ‘ग्रामविकास’ पॅनल राळेगणसिद्धीत विजयी झाले.
हिवरे बाजारमध्ये पोपटरावांवर विश्वास
पोपटराव पवारांनी सुरू केलेली अविरोध निवडीची परंपरा खंडित झाली, पण त्यांच्या ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. निकालानंतर कोणताही जल्लोष न करता ग्रामस्थांनी आदर्श उदाहरण राज्यासमोर ठेवले.
अकलूजमध्ये गड आला पण सिंह गेला
भाऊबंदकीच्या लढतीत १७ पैकी १४ जागा जिंकत विजयसिंह मोहिते पाटील गटाची सरशी झाली, मात्र पॅनल प्रमुख संग्रामसिंह मोहिते यांचा पराभव झाला. माळशिरस तालुक्यात विजयसिंह मोहिते यांनी भाजपचा झेंडा फडकवला.
‘आदर्श गाव’ पाटोद्यात पेरेंचे पॅनल नाकारले
औरंगाबादमधील पाटोदा आदर्श गावाचे २५ वर्षे नेतृत्व करणारे व विकासपुरुष अशी बिरुदावली मिरवणारे भास्करराव पेरे पाटील यांची कन्या अनुराधा यांना १८७ तर त्यांच्या विराेधात मंदा खाेकड यांना २०४ मते. पेरेंचे पॅनलही सत्तेतून बाद.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.