आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकऱ्यांच्या उसाचा एक टिपरुही राहू देणार नाही. राज्यातील सर्व ऊस हा गाळपासाठी साखर कारखान्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. असे आश्वासन राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. मात्र, असे असले तरी राज्यातील ऊस उत्पादन शेतकऱ्यांचे यंदा उसाने मोठ्या प्रमाणात हाल केले आहे. मे महिन्याचा दुसरा आठवडा संपत आला असून, राज्यातील बहुतांश भागात अजूनही ऊस उभाच आहे. त्यात आता पावसाचे दिवस डोक्यावर आल्याने आणि कारखान्यांचा गाळप हंगाम बंद होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला आहे. 16 महिन्यांचा ऊस होऊनही अनेक शेतकऱ्यांना तोडणी मिळालेली नाही. त्यात जवळपास सर्वच ऊस तोडणी कामगार शेतकऱ्यांकडून हवा तेवढा पैसा तोडणीसाठी उकळत आहे.
'दिव्य मराठी'ने राज्यातील अनेक भागात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. त्यात उसाला वेळेवर तोडणी न मिळाल्याने शेतकरी आता उसाचे पीक घेण्यासही घाबरत आहे. तसेच पूर्वी उसाची तोडणी एक रुपयाही न देता केली जायची मात्र यंदा एक एकर ऊस तोडणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ऊस तोडणी कामगारांना 15 ते 20 हजार रुपये एकरी द्यावे लागत आहे. इतकेच नाही तर पैसे देऊनही लेबरमागे नंबर लावण्यासाठी शेतकऱ्यांना चकरा मारावे लागत आहे.
साखर कारखान्याची आवश्यकता
यंदा ऊस वेळेवर गाळपासाठी न गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उसाचा कालावधी अधिकचा झाल्याने तसेच उन्हाचा तडाखा देखील मोठ्या प्रमाणात असल्याने उसाचे वजन घटले आहे. वेळेवर उसाला तोडणी न मिळण्याचे प्रमुख कारण साखर कारखान्यांची कमतरता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
मला रोज चिंता सतावते
रोज मला उसाची चिंता सतावते, कारण आता पावसाळा तोंडावर आला आहे. मात्र अद्याप ऊस रानात उभा आहे.जर ऊस गाळपासाठी गेला नाही तर वर्षभराची मेहनत पाण्यात जाईल. त्यामुळे लवकरात लवकर उसाला तोडणी मिळावी. - अमन शेख, शेतकरी, अगर कानडगाव
व्याजाने पैसे काढून मातीत टाकले
ऊस सुकुन गेला आम्ही मातीत पैसे टाकले आता आत्महत्या करायची वेळ आली हे सरकार शेतकऱ्याचा नीट जगू देतं का? सावकाराकडून ऊस लावायला पैसे घेतले होते, मात्र उसाला तोडणी मिळत नसल्याने, व्याजाचा पैसा काढून आम्ही मातीत टाकला. आता आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. -कडुबाई चव्हाण महिला शेतकरी, भिवधानोरा, तालुका गंगापूर
सरकारने एकरी सव्वा लाखांची मदत करावी
महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा जवळपास 23 लाख टन ऊस उभा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सावकाराकडून खाजगी कर्ज काढून ऊसाला खर्च केला. ऊस तोडणी करणारे देखील एकरी 15 ते 20 हजार रुपये मागत आहे. त्यात वेळेवर ऊस गाळपासाठी न गेल्याने त्याचे वजन देखील घटले असून आता एकरी 30 ते 40 टन ऊस जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी जवळपास 60 ते 70 हजार रुपये खर्च करून देखील उसाला तोडणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी जगायचे कसे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतामध्ये ऊस उभा असून सावकार दारामध्ये चकरा मारत आहे, त्यामुळे शेतकरी नैराश्यात गेला आहे. ज्या शेतकऱ्यांचे ऊस शेतात उभा आहे त्याला एकरी 40 टन ग्राह्य धरून राज्य सरकारने सव्वा लाख रुपयांची मदत करावी. जेणेकरून त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. - भाऊसाहेब शेळके, शेतकरी, भिव-धानोरा
ऊस लावून पश्चाताप झालाय
गेल्या आठ महिन्यांपासून शेतात ऊस उभा आहे. त्यात उन्हाच्या तीव्रतेने उसाचे वजन घटले आहे. चार महिन्यापासून मी कारखान्याच्या दारी चकरा मारतोय मात्र ऊस तोडायला कोणीही तयार नाही. त्यामुळे ऊस लावून पश्चाताप होत आहे. आता कमवायचं काय आणि खायचं काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. इकडून तिकडून पैसे गोळा करून आम्ही ऊस लावला पण आता आमचं सगळं वाटोळं झालं - भैय्या शेख, शेतकरी, देवगाव तालुका नेवासा
साखर आयुक्तांना ग्राउंड रिअॅलिटी माहित नाही
साखर आयुक्तांना ग्राऊंड रिअॅलिटी माहीत नाही. महाराष्ट्रात अद्याप 30 टक्क्यांपेक्षा अधिक ऊस शिल्लक आहे. लागवडीच्या कालावधीनुसार उसाची तोडणी करून कारखान्यांनी गाळप करावे. सरकारने तसे धोरण ठरवायला हवे. शेतकऱ्यांचा 12 ते 14 महिन्यांचा ऊस शेतात तसाच ठेवला जातोय.- राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
मराठवाड्यात उसाचा प्रश्न गंभीर
बीड, परभणी, औरंगाबाद, जालना या भागात कारखान्यांचे जाळे मोठे आहे. त्यामुळे शेतकरी उसाची नोंद करत नाही. म्हणूनच शिल्लक उसाची अधिकृत आकडेवारी नाही. कारखान्यांत नोंद नसलेल्या उसाचे करायचे काय? -डॉ. अजित नवले, शेतकरी नेते.
तातडीने दिलासादायक उपाययोजना करणे आवश्यक
साखर सहसंचालक व सबंधित यंत्रनेने तातडीने शिल्लक उसाचे पंचनामे करावेत तसे आश्वासन साखर सहसंचालक औरंगाबाद यांनी किसान सभेला गुरुवारी दिले.याशिवाय गाळपाअभावी शिल्लक राहील अशा उसाला प्रति एकर एकलाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. मार्चनंतर गाळप झालेल्या उसाला प्रति टन 500 रुपये नुकसान भरपाई किंवा घट परतावा मिळावा जेणेकरून आत्महत्या होणार नाहीत यासाठी तातडीने दिलासादायक उपाययोजना करणे आवश्यक आहे. - डॉ. भाऊसाहेब झिरपे, जिल्हा सचिव किसान सभा औरंगाबाद
अनेक कारखान्यांचे गाळप बंद
जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून ऊस तोडणी हंगाम सुरू आहे. त्यात आता ऊन आणि पावसाचे दिवस येऊन ठेपल्याने अनेक कारखान्याचे गाळप बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच ऊसतोड कामगारांनी देखील घरची वाट धरली आहे. महाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आहे, 199 साखर कारखान्यांपैकी 120 साखर कारखान्यांनी त्यांचे गाळप संपवले आहे, गेल्या वर्षी 3 एप्रिल 2021 पर्यंत 190 कारखान्यांपैकी 118 कारखान्यांनी गाळप बंद केले होते.
आम्हाला घरदार आहे की नाही
गेल्या सात महिन्यापासून आम्ही ऊस तोड करत आहोत. आता आम्हाला घरी जायचे आहे, घरचे आमची वाट पाहत आहे. पाऊस तोंडावर आला त्यामुळे आम्हाला घरच्या जमिनीची नांगरणी-डोंगरणी करायची आहे. आता आम्ही ऊस तोडू तोडू कंटाळलो, आम्हाला घरदार आहे की नाही.- ताराचंद आडे, मुकादम, ऊस तोडणी मजूर
ऊस लागवड क्षेत्र जास्त झाल्याने ही परिस्थिती
गेल्या दोन वर्षभरापासून राज्यात सर्वत्र पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे कल धरला आहे. ऊसाचे क्षेत्र वाढले मात्र कारखान्यांच्या गाळपाची क्षमता ही पूर्वी इतकीच आहे. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.- डॉ.सोमिनाथ घोळवे, ऊस शेतीचे जाणकार
राज्यात ऊस तोडणी न मिळाल्याने दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
उसाला वेळेवर तोडणी मिळत नसल्याने राज्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. त्यात राज्यात पहिली आत्महत्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या जनार्धन माने यांनी केली. तर दुसरी आत्महत्या बीडच्या गेवराईमधील हिंगणगावातील नामदेव जाधव (वय 35) यांनी 11 मे रोजी शेतात दोन एकर ऊस पेटवून झाडाला गळफास घेतला.
पुढच्या वर्षी याहीपेक्षा जास्त हाल होणार
ऊस तोडणीची अशी स्थिती कधीच आली नाही. शक्य होईल तितका ऊस गाळपासाठी नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दुसऱ्या कारखान्यांकडून मजूर मिळते का किंवा हार्वेस्टिंगद्वारे ऊस काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. यावर्षी जितके हाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे झाले त्याही पेक्षा जास्त परिस्थितीचा सामना पुढील वर्षी करावा लागणार आहे. कारण, शेतकऱ्यांनी 3 टक्के देखील ऊस मोडलेला नाही आणि त्यात पुन्हा लागवडी वाढतच आहे. - कुंजर, शेतकी अधिकारी मुक्तेश्वर शुगर, धामोरी
पावसामुळे चिंतेत भर
भारतीय हवामान खात्याने या वर्षी सरासरी 98 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यात मान्सून वेळेआधी दाखल होण्याची शक्यता आहे. 22 मे ला अंदमान निकोबारमध्ये दाखल होणारा मान्सून या वर्षी 17 ते 19 मे दरम्यान दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.
उसाची अशी स्थिती असतानाही लागवड सुरूच
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे या वर्षी तोडणी अभावी मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. असे असतानाही शेतकरी ऊसाची लागवड थांबवण्याऐवजी पुन्हा अधिकची लागवड करत आहे. कारण, गेल्या दोन वर्षांपासून राज्यात अतिवृष्टीसदृश पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यामुळे ऊसाला इतर पिकांच्या तुलनेत चांगला भाव असल्याने शेतकऱ्यांचा इतर पिकावरील विश्वास उडाला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील 11 मे 2022 पर्यंत काय आहे परिस्थिती
औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप
शरद साखर कारखाना पैठण- एकूण गाळप 196235 मे. टन शिल्लक ऊस: 15048 मे. टन
मुक्तेश्वर शुगर, गंगापूर- एकूण गाळप 437740 मे.टन शिल्लक ऊस: 51070 मे. टन
बारामती अॅग्रो, कन्नड- एकूण गाळप 10000611 मे. टन शिल्लक ऊस 800 मे. टन
संभाजी चितेगाव- एकूण गाळप 383182 मे.टन शिल्लक ऊस: 18784 मे.टन
संत एकनाथ, पैठण- एकूण गाळप 256950 मे. टन, शिल्लक ऊस 71730 मे.टन
जालना: जिल्ह्यातील एकूण गाळप 2396433 मे. टन शिल्लक ऊस 801842 मे.टन
समर्थ कारखाना अंबड- एकूण गाळप 795952 मे.टन शिल्लक ऊस 273323 मे.टन
समर्थ अंबड (सागर)- एकूण गाळप 509779 मे. टन शिल्लक ऊस 230328 मे.टन
समृद्धी शुगर्स- एकूण गाळप 508492 मे.टन शिल्लक ऊस 102191
श्रद्धा, परतूर- एकूण गाळप 582210 मे.टन शिल्लक ऊस 196000 मे. टन
बीड : जिल्ह्यात 4553528 मे. टन ऊसाचे गाळप झाले असून, 839636 मे. टन ऊस शिल्लक आहे.
जयभवानी गेवराई- एकूण गाळप 572445 मे.टन शिल्लक ऊस 38856 मे.टन
लोकनेते माजलगाव- एकूण गाळप 975000 मे.टन शिल्लक ऊस 185000 मे.टन
NSL शुगर, माजलगाव- एकूण गाळप 1142023 मे.टन शिल्लक ऊस 361890 मे. टन
छत्रपती माजलगाव- एकूण गाळप 474638 मे. टन शिल्लक ऊस 14000 मे. टन
वैद्यनाथ परळी- एकूण गाळप 299361 मे. टन शिल्लक ऊस 13594 मे.टन
अंबाजोगाई (व्यंकटेश्वरा)- एकूण गाळप 197680 मे.टन शिल्लक ऊस 87010 मे.टन
शिल्लक ऊसाचा मोठा प्रश्न- उपमुख्यमंत्री पवार
“कारखान्यांचा हंगाम संपत आला असला, तरी राज्यात शिल्लक ऊसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. हंगाम संपत आला असला, तरी कारखाने सुरू ठेवून शिल्लक ऊसाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
ऊस संपवण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले- पवार
“शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी इतर कारखान्यांकडून या उसाचे गाळप करावे. यासाठी 1 मे पासून वाहतूक अनुदान आणि रिकव्हरी लॉस दिला जात आहे. सरकारकडून मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्याला दिले जात आहे. शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे ही त्या मागची भूमिका आहे. त्या त्या विभागातील ऊस संपवण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे,” असेही अजित पवार म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.