आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यात अनलॉक -4:ई-पासची कटकट अखेर संपली, खासगी वाहतुकीलाही परवानगी; जिम, बार, सिनेमा थिएटर्स बंदच

मुंबई5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • कार्यालयात 30% उपस्थितीची मुभा; हॉटेल, लॉजेस पूर्णपणे सुरू होणार

राज्य सरकारकडून अनलॉक ४.० च्या मार्गदर्शक सूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. २ सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत असून खासगी बस, मिनी बस अाणि खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात अाली असून जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे.

राज्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ सप्टेंबरपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज २०० उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून १०० विमाने जाणार व १०० येणार. यापूर्वी आतापर्यंत कोरोना संकटामुळे हा आकडा ५०-५० असा होता.

शाळा, कॉलेज तसेच इतर शैक्षणिक संस्था आणि कोचिंग क्लास ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्याशिवाय सिनेमागृह, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, मॉल्समधील थिएटर, बार, ऑडिटोरियम इत्यादी जागा पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

२ सप्टेंबरपासून बिगर अत्यावश्यक दुकाने नियमित वेळेप्रमाणे सुरू राहतील. तसेच मद्याची दुकानेही सुरू राहणार आहेत. हॉटेल आणि लॉज हे १०० टक्के क्षमतेद्वारे सुरू करता येणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची कार्यालयात १०० टक्के हजेरी पूर्वीप्रमाणे ठेवता येईल.

मुंबई महानगर क्षेत्रातील तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शासकीय कार्यालये ३० टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयांत ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. खासगी कार्यालयात ३० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्यास मुभा आहे. कार्यालयात कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता अधिकारी नियुक्त केले जातील.

चारचाकीत चालकासह ४ जणांना मुभा

टॅक्सी, कॅबमध्ये आता १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकी मोटारीत १ अधिक ३ आणि दुचाकीवर १ अधिक १ अशा वाहतुकीस परवानगी असणार आहे. ६५ वयावरचे वरिष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि १० वर्षांच्या आतील बालके यांना सार्वजनिक ठिकाणी नेण्यास प्रतिबंध आहे.

वाहतुकीसाठी स्वतंत्र नियमावली

जिल्ह्याबाहेर खासगी प्रवासी वाहतूक किंवा मालवाहतूक करण्यासाठी किंवा आंतरराज्य प्रवासासाठी कोणतीही बंधने असणार नाहीत. ई-पासची अट आता नसेल. मात्र, जिल्ह्याबाहेर वाहतुकीसाठी परिवहन विभाग स्वतंत्रपणे सुनिश्चित पद्धती आखून देणार आहे.

बार, माॅल्स, थिएटर, जिम बंदच :

 • जिम व मंदिरांचा निर्णय नाही.
 • प्रतिबंधित क्षेत्रात व्यवहारांना बंदी.
 • महानगरपालिका क्षेत्रातील कर्मचारी उपस्थितीचा निर्णय स्वतंत्र जारी होणार.
 • बार, माॅल्स, थिएटर्स यांना अनुमती नाही.
 • शाळा, महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंद.
 • लग्नास ५०, तर अंत्यविधीस २० लोकांना उपस्थित राहता येणार.
 • गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी कायम.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser