आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगा आणि जगू द्या:विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज- मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण स्वतःला या पृथ्वीचे मालक समजू लागलो आहोत, जमिनीवरचा कायदा हा आपला आहे. पण निसर्गाचे नियम त्यापेक्षा वेगळे आहेत. ते नियम आपण पाळले नाही तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज आहे, असे सांगून आपल्याला आपले वन आणि वन्यजीव वैभव जपायचे आहेच. त्यासाठी जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र गाठीशी बांधत पुढं जाऊया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वन्यजीव सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याहून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.तर सह्याद्री अतिथी गृह येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साई प्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी आदि मान्यवर उपस्थित होते.तर राज्यभरातून वन विभागातील अधिकारी ,कर्मचारी,वन्यप्रेमी नागरिक दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, आपण कायदे करतो आणि आपल्या सोयी प्रमाणे त्याचा अर्थ लावतो. विकासाचे वेडे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कोणता विनाश करत आहोत. हे न बघता आज आपण पुढे जात आहोत. चक्रीवादळ, अतिवृष्टी ही त्याची उदाहरणे आहेत. आपण वनांमध्ये घुसखोरी करीत आहोत. निसर्गावर आपण आक्रमण केले आणि ते असह्य झाले की निसर्ग आपले अतिक्रमण आपल्या पद्धतीने दूर करतो.त्यामुळे समजून, विचार करून पुढे जाणे गरजेचे आहे.वन, वन्यजीव आणि पर्यावरणाप्रती लोकांमध्ये जशी जनजागृती झालीच पाहिजे तशीच ती राजकीय नेत्यांमध्येही झाली पाहिजे असे मत मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केले.

शालेय अभ्यासक्रमात समावेश व्हावा
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन, वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासंदर्भातील रुची निर्माण करण्यासाठी अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश व्हावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. नाशिकला 'मित्रा' नावाची संस्था स्थापन करण्यात आली आहे. या संस्थेत पर्यावरणपूरक विकास कसा करायचा या संबंधीचा अभ्यास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अन्न ,वस्त्र ,निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यातही निवाऱ्याची गरज पूर्ण करण्यासाठी आपण वस्त्या वाढवत आहोत, जंगलांमध्ये जात आहोत. वाढणाऱ्या मानवी वस्त्यांना मूलभूत सुविधा,पाणी कसे द्यायचे याचा विचार करण्याची गरज आहे कारण त्या सुविधा देताना लाखो झाडांची आहुती द्यावी लागते.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, जिथे जंगल अधिक तिकडे पाऊस जास्त पडतो. पण अलिकडच्या काळात हे चित्र बदलते आहे .चेरापुंजी नाही तर दुसऱ्या भागात जास्त पाऊस पडत आहे, कोकण, मराठवाड्यात आपण अशी अतिवृष्टी पहिली आहे. त्यामुळे वन व वन्यजीव संवर्धन हे महत्त्वाचे आहे.

वन संरक्षक हे वनांचे खरे रक्षक त्यांना आगामी काळात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.

बातम्या आणखी आहेत...