आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उष्णतेची लाट:गतवर्षीच्या तुलनेत 14 दिवस आधीच महाराष्ट्रात तापमानाने गाठली चाळीशी, अकोल्यात सर्वाधिक 42.9 डिग्री सेल्सियस

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात १४ दिवस आधीच तापमानाने ४० डिग्री सेल्सियसचा टप्पा गाठला. राज्यात उष्णतेची लाट आली असून बुधवारी राज्यातील १२ शहरांतील तापमानाने चाळिशी पार केली होती. अकोल्यात सर्वाधिक ४२.९ तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्यात स्वच्छ आणि निरभ्र वातावरण असून गुजरात, राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण व कोरड्या हवेमुळे समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांना वाहण्यासाठी विलंब होत असल्याने राज्यात उष्णतेची लाट आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात दिवसभर उन्हाचा चटका जाणवत आहे. गत तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली असून सोमवारी (१४ मार्च) रत्नागिरी येथे यंदाच्या वर्षातील प्रथमच ४० डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती. गतवर्षी सन २०२१ मध्ये २७ मार्च रोजी मुंबईत तापमानाने सर्वप्रथम चाळिशी गाठली होती. त्यानंतर ३१ मार्च रोजी जळगाव येथे ४० डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली होती.

रस्त्यांवर शुकशुकाट
बुधवारी उन्हाची काहिली अधिक जाणवत होती. साहजिकच दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. लस्सी, ताक, रसाच्या दुकानांत गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यातील उष्णतेची लाट गुरुवारपर्यंत कायम राहणार असून त्यानंतर हळूहळू कमी होईल, असे नाशिकचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान
अकोला : ४२.९, वाशिम : ४१.५, वर्धा : ४१.४, अमरावती : ४१.०, सोलापूर : ४१.०, अहमदनगर : ४०.८, नागपूर : ४०.९, परभणी : ४०.७, चंद्रपूर : ४०.६, यवतमाळ : ४०.५, नांदेड : ४०.०, औरंगाबाद : ३८.९, मालेगाव : ४०.०, गोंदिया : ३९.२, ठाणे : ३९.०, नाशिक : ३९.०, कोल्हापूर : ३९.०, बुलडाणा : ३८.५, पुणे : ३८.१, जालना : ३७.०

बातम्या आणखी आहेत...