आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिकांचा एनसीबी-भाजपवर हल्लाबोल:वसूली गँगचा पर्दाफाश होतोय, समीर वानखेडेंना अटक झाल्यावर अनेक गोष्टींचा उलगडा होणार- मलिकांचा दावा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समीर वानखेडे यांनी एनसीबीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. मुंद्रा पोर्ट आणि जेएनपीटी पोर्ट येथे हजारो कोटींचे अंमली पदार्थ मिळाल्यानंतरही एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पुन्हा एनसीबी आणि भाजपवर हल्लाबोल केला. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

भाजपनेच महिलांवर टीप्पणी करण्याचा स्तर खाली आणला
जयदीप राणा या ड्रग पेडलरबद्दल मी काल काही तथ्य माध्यमांसमोर मांडली. मात्र तेव्हापासून एक अपप्रचार सुरु आहे की, मी फडणवीस यांच्या पत्नीला या प्रकरणात खेचत आहे. मात्र हा आरोप चुकीचा असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपनेच महिलांचा अवमान केल्याचा आरोप केला. कालच किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या आई आणि बहिणीचा उल्लेख केला. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची पत्नी, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडी कार्यालयात चौकशीला बोलवले होते. किरीट सोमय्या हे महाराष्ट्राच्या मा. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव घेऊन वारंवार आरोप करत असतात. या सर्व महिला नाहीत का? असा प्रश्न उपस्थित करत महिलांचा अवमान करण्याचा स्तर भाजपनेच खाली आणला आहे आम्ही नाही, असे नवाब मलिक म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आता माफी मागावी

कालच्या माझ्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनीही पत्रकार परिषद घेऊन काही आरोप केले. त्यात ते म्हणाले की, माझ्या जावयाच्या घरी गांजा सापडला. मला त्यांना सांगायचे आहे की, देवेंद्रजी तुम्ही तुमच्या वानखेडेकडून पंचनामा मागवून घ्या. त्यात कुठेही गांजा किंवा आपत्तीजनक वस्तू प्राप्त झाली असल्याचा उल्लेख नाही. ज्यादिवशी जावयाच्या घरी छापा टाकण्यात आला त्यावेळी मीडियाला खोट्या बातम्या देऊन आम्हाला बदनाम केले गेले. माध्यमांना आज मी तो पंचनामा देत आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागवून दाखवावी.

मी जावयाची चार्जशीट कमकुवत करण्यासाठी एनसीबीवर आरोप करतोय, असेही सांगितले गेले. फडणवीस हे स्वतः वकील आहेत. एनडीपीएस कायद्यानुसार सहा महिन्याच्या आत चार्जशीट दाखल करावी लागते. समीर खान आणि सजनानीच्या केसमध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे. मी चार्जशीट कमकुवत केलेली नाही. त्यामुळे याही प्रकरणात आपण माफी मागणार का? असा थेट सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

त्यांनी दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही..
काल फडणवीस म्हणाले की, ते दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहेत. पण त्यांना दिवाळीपर्यंत थांबण्याची गरज नाही. माझे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असे सांगितले गेले. पण माझे कधीच अंडरवर्ल्डशी संबंध आलेले नाहीत. तसेच देवेंद्रजी म्हणाले की, ज्यांचे घर काचेचे आहे त्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नयेत. माझ्याकडे काचेचा महाल तर नाही. पण फडणवीसांना माझा थेट सवाल आहे.

समीर वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीकडून मोठ्या प्रमाणात वसुली
समीर वानखेडे जेव्हापासून एनसीबी विभागात आला तेव्हापासून वानखेडेने आपली प्रायव्हेट आर्मी बनवली. त्यात किरण गोसावी, मनिष भानुशाली, फ्लेचर पटेल, आदिल उस्मानी, सॅम डिसूजा, इलू पठाण होते. ही प्रायव्हेट आर्मी मुंबईत ड्रग्जचा व्यवसाय देखील करते. नावासाठी केवळ छोट्या छोट्या लोकांना पकडून कारवाई दाखवली जाते. तसेच वानखेडेच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली गोळा केली गेली. प्रभाकर साईलने सांगितल्याप्रमाणे आर्यन खान प्रकरणात 18 कोटींची वसुली मागितली गेली. सॅम डिसूजा देखील समोर आला असून त्यात त्याने पैसे मागितल्याबद्दल कबुली दिली आहे. मात्र एनसीबीचा यात हात नसल्याचे त्याने म्हटले असले तरी अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. किरण गोसावी कारवाईच्या ठिकाणी काय करत होता? 13 लोकांचे फोटो सर्व लोकांना आधीच कसे दिले होते? 15 दिवसांपासून प्लॅनिंग कशी काय सुरू होती? हे प्रकरण पूर्ण फर्जीवाडा असून वानखेडेंनी ते रचले होते, असा आरोप मलिक यांनी केला.

पहिल्या दिवसापासून मी या प्रकरणातील अनेक बाबी समोर आणल्या. मात्र सत्यमेव जयतेचा मुखवटा धारण करुन हे लोक प्रकरण दाबत होते. 15 ऑक्टोबर 2020 रोजी समीर वानखेडेंनी एक केस दाखल केली. याच केसमध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोन यांची एनसीबी कार्यालयात परेड केली गेली. आजपर्यंत ही केस बंद झालेली नाही किंवा चार्जशीट दाखल केलेली नाही. याच केसमध्ये हजारो कोटींची वसुली करण्यात आली आहे. मालदीव आणि दुबईमध्ये पैसे घेतले गेले. त्याचेही फोटो मी आधीच दिले आहेत. वानखेडेंनी सहपरिवार मालदीवचा दौरा केला. मालदीवला एवढे दिवस जाणे खर्चिक बाब असते. याची एनसीबीच्या व्हिजिलन्स टीमने चौकशी करायला हवी, अशी मागणी देखील मलिक यांनी केली.

वानखेडेंनी महागडे कपडे घालण्यात मोदी साहेबांनाही मागे टाकले
एनसीबीचे ज्ञानेश्वर सिंह आणि इतर अधिकारी टीव्हीवर येतात, तेव्हा त्यांचे कपडे आम्ही पाहिले. कुणाचेच हजार पाचशेच्यावर कपडे नाहीत. मग समीर वानखेडेच रोज 50 ते 70 हजारांचे शर्ट कसे काय घालतात? दोन लाखांचा पट्टा, एक लाखांची पँट आणि अडीच लाखांचे बुट घालून ते वावरतात. घड्याळदेखील 20 ते 50 लाखांचे घालतात. वानखेडेंच्या या कलेक्शनची किंमतच पाच ते दहा कोटींची असल्याचा आरोप मलिक यांनी केला. वानखेडेसारखा प्रामाणिक व्यक्ती दहा कोटींचे कपडे घालू शकतो का? महागडे कपडे घालण्यात वानखेडेंनी तर मोदींनाही मागे टाकले आहे, अशी उपहासात्मक टीका नवाब मलिक यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...