आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंचा राणेंवर पलटवार:बाळासाहेब ठाकरे यांनी खोटे बोलणाऱ्यांना हाकलून लावले; नारायण राणे यांच्या समोर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला

सिंधुदुर्ग7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा पाहायला मिळाले. एवढेच नाही तर व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. तर उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही -

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केले आणि कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचे कॅलिफोर्निया करु असे अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळे अनेकांना लाभ होणार आहे, असेही ते म्हणाले.

बाळासाहेबांनी खोटे बोलणाऱ्यांना हाकलून लावले -

नारायण राणे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. नारायणराव आपण म्हणता ते खरे आहे. तुम्ही जी विकासकामे केली त्यात तुमचे योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असे अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे. म्हणून खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे. हे ही खरे आहे की, बाळासाहेबांना खोटे बोलणारी लोके आवडत नव्हती. म्हणूनच अशी खोटे बोलणारी लोकं त्यांनी शिवसेनेतून काढून टाकली होती, हा सुद्धा इतिहास आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर पलटवार केला आहे.

पाठांतर करुन बोलणे वेगळे, आत्मसात करुन बोलणे वेगळे, तळमळीने बोलणे वेगळे आणि मळमळीने बोलणे वेगळे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...