आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरभणी जिल्ह्यात दवाखान्यात जाण्यासाठी एका गरोदर मातेला चक्क पुराच्या पाण्यातून थर्माकॉलच्या होडीने जीवघेणा प्रवास करावा लागल्याची घटना मानवत तालुक्यातील नीलवर्ण टाकळी येथे घडली आहे.
मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान परभणी जिल्ह्यातील धरण, प्रकल्प यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यात सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग दुधना नदी पात्रात करण्यात आल्याने दुधना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असून मानवत तालुक्यातील निलवर्ण टाकली येथे गावाला जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या शिवकन्या अंगद लिंबुर्टे या महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला आहे. या चित्तथरारक घटनेचा व्हिडीओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झला आहे.
परभणी जिल्ह्यात 6 आणि 7 सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस बरसला असून 9 पैकी 8 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले, ओढे यांना पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला होता. यात दुधना नदी ही दुथडी भरून वाहत असून निम्न दुधना प्रकल्पातून ही पाण्याचा विसर्ग सुरू आल्याने मानवत तालुक्यातील निलवर्ण टाकळी येथील गावाचा ही संपर्क तुटला आहे. दरम्यान बुधवार 8 सप्टेंबर रोजीच्या सकाळपासून प्रसूतीसाठी माहेरी आलेल्या शिवकन्या लिंबुर्टे यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या, परंतु गावाचा मागील तीन-चार दिवसापासून नदीला पूर आल्याने संपर्क तुटला होता.
गावाच्या बाहेर जाण्यासाठीच्या एकमेव पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वहात होते, शिवाय गावात कुठल्याही आरोग्य सेवा उपलब्ध नव्हता. अशा बिकट परिस्थितीत प्रसूतीसाठी मोठ्या दवाखान्यात दाखल करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. म्हणून कुटुंबाने काळजावर दगड ठेऊन नदी ओलांडण्याचा जिवघेणा निर्णय नाईलाजाने घेतला. नदी पार करून पलीकडे जाण्यासाठी एकच पर्याय होता. तो म्हणजे थर्माकोलची होडी. त्या होडीच्या आधाराने नदीच्या प्रवाहातून पलीकडे जाण्यासाठी कसरत करत, बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या शिवकन्या अंगद लिंबुर्टे यांना होडीत झोपून कुटुंबातील तीन महिलांच्या सोबतीने आणि होडी चालक रमेश उत्तम कुटारे यांच्या मदतीने यशस्वीरीत्या प्रवास पार केला. त्यानंतर परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. वेळेवर दवाखान्यात दाखल केल्याने शिवकन्या लिंबुर्टे यांची प्रसूती सुखरूप पणे झाली असून त्यांनी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या आईची आणि बाळाची तब्येतही चांगली आहे.
दरम्यान, भविष्यात कुणालाही असा जिवघेणा प्रवास करण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी निलवर्ण टाकळी ते कुपटा हा रस्ता जोडून देण्याची गावकऱ्यांनी मागणी केली आहे. या घटनेवरून परभणी जिल्ह्यात आज ही दळणवळणाची परिस्थिती किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.