आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापुरानंतर:50% साठा आवश्यक असताना कोयनेत होते 77 टीएमसी पाणी, म्हणूनच आला पूर; जल आयोगाच्या नियमालाच हरताळ, मुख्यमंत्री आज सांगलीत आढावा घेणार

सांगली (गणेश जोशी )2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन हजार कोटींचे नुकसान टाळणे शक्य : दिवाण

दक्षिण महाराष्ट्रातील महापुराच्या संकटावर मात करण्यासाठी राज्यातील आघाडी सरकार विविध मार्ग काढत आहे. त्यामध्ये कृष्णा नदीच्या पात्राभोवती सुमारे २०० किलोमीटर अंतराची किमान ६० फूट उंचीची भिंत बांधणे, महापुराचे पाणी दुष्काळी भागाला देणे, कृष्णा-भीमा स्थिरीकरण अशा विविध उपाययोजना राबवण्याचे संकेत दिले जात आहेत. परंतु तांत्रिकदृष्ट्या या योजनेकडे पाहिल्यास अस्मानी संकटामुळे कृष्णा, वारणा, पंचगंगा यासह सुमारे १० ते १२ नद्यांना महापूर येतो. तसेच ५० % साठा आवश्यक असताना कोयनेत ७७ टीएमसी पाणी आल्याने पूर आल्याचे तज्ञांचे मत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सांगलीच्या दौऱ्यावर असून तिथे आढावा बैठकही घेणार आहेत.

कृष्णा खोऱ्यातील विविध नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यांतील नागरिकांचे तीन हजार कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. महापुराला अस्मानी संकट कारणीभूत असले तरीही प्रशासनाची भूमिका आणि कोयना, धोम, कण्हेर, राधानगरी, वारणा व दूधगंगा या धरणात जुलै महिन्याअखेर राष्ट्रीय जल आयोगाने सुचवलेल्या तत्त्वापेक्षा कित्येक पटीने अधिक करण्यात येणारा अतिरिक्त पाणीसाठा हाच मुख्यत्वे कारणीभूत ठरतो, असे जलतज्ज्ञांचे मत आहे. जल आयोगाच्या तत्त्वानुसार ३१ जुलै रोजी कोयना धरणात ५० टक्के पाणीसाठा करणे क्रमप्राप्त असताना प्रत्यक्षात २५ जुलैला कोयना धरणात तब्बल ७७ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळेच या कालावधीत सुरू असलेल्या धुवाधार पावसातही कोयनेतून ५० हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात होता. कृष्णा नदीवर विविध धरणांतून सुमारे अडीच लाख क्युसेक पाणी येत होते. वारणा पंचगंगा धरणातून सोडण्यात येणाऱ्या प्रवाहाने कृष्णेचे पाणी पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळेच सांगलीला पुराचा फटका बसला.

कृष्णातील धरणांची क्षमता टीएमसीमध्ये
१) कोयना १०५. २३
२) धोम १३.०५
३) कण्हेर १०.१०
४) बलकवडी ४.०८
५) तारळी ५.८५
६) तुळशी ३.४७
७) वारणा ३४.२०
८) उरमडी ९.८६
९) राधानगरी ८.३६
१०) दूधगंगा २५
एकूण पाणी १९४.९७

कोयनेतील विविध योजनांसाठी साठा
पिण्याचे पाणी ४.५०
शेती (कृषी) १७
उद्योग ४
विद्युतनिर्मिती ६७.५०
उपसा सिंचन २०
(पाणी टीएमसीमध्ये)

तीन हजार कोटींचे नुकसान टाळणे शक्य : दिवाण
जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी विजय दिवाण यांच्याशी चर्चा करताना त्यांनी केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवणे, आलमट्टी, कोयना, वारणा, राधानगरी, धोम, कण्हेरसह सर्व धरणांतील पाणी विसर्गाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक शासनात मिनिट टू मिनिट समन्वय ठेवला जावा, असे मत व्यक्त करताना केंद्रीय जल आयोगाने सुचवलेल्या ३१ जुलैअखेर धरणाच्या क्षमतेचा ५० टक्के पाणीसाठा ठेवावा आणि १५ सप्टेंबरपर्यंत धरण पूर्णक्षमतेने भरण्यात यावे. ऑगस्टअखेर व सप्टेंबर महिन्यात पाऊसमान कमी झाल्यास धरण पूर्ण क्षमतेने न भरल्यास सर्वसाधारणपणे एक हजार मेगावॅट वीज विकत घ्यावी लागल्यास ३०० कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडू शकतो. परंतु महापुरामुळे होणारे तीन हजार कोटींचे आर्थिक नुकसान टळेल.

कृष्णा नदीच्या पात्राशेजारी सर्वत्र गाळाची जमीन
कृष्णा नदीच्या पात्राशेजारी सर्वत्र गाळाची जमीन आहे. त्या ठिकाणी पाया काढणे अत्यंत कठीण आहे. आणि तसेच २०१९ ला आलेल्या महापुराच्या वेळी सर्वसाधारण ५९ फूट पाणी होेते. त्याचा विचार करता ही भिंत किमान ६५ फूट बांधावी लागेल आणि त्यासाठी किती महापुराच्या संकटांना सामोरे जावे लागेल याचा विचारही केला गेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापुराच्या संकटावर कृष्णा-भीमा स्थिरीकरण करण्याचा मुद्दा लावून धरला आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर महापुराला वेसण घालता येईल असा दावा केला. या योजनेसाठी सुमारे १८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी या योजनेवर आजपर्यंत ७०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...