आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी वटपौर्णिमा विशेष:अब्जावधी लिटर ऑक्सिजनचा पुरवठा करणारा महाराष्ट्राचा महावटवृक्ष..

पेमगिरीएका महिन्यापूर्वीलेखक: एकनाथ पाठक
  • कॉपी लिंक
  • अब्जावधी लिटर ऑक्सिजनचा विनामूल्य प्रकल्प!

कोरोना काळात सर्वाधिक चर्चा झाली ती ऑक्सिजनची. माणसाच्या जगण्यासाठी संजीवनी ठरलेल्या या ऑक्सिजनचा तब्बल तीन शतके अविरत पुरवठा करणारा ‘महाराष्ट्राचा महावड’ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावात दिमाखात उभा आहे. जाखमत बाबा आणि जाखाई माता मंदिराच्या आश्रयाने विस्तारलेल्या या महावडाच्या मूळ वृक्षाचा घेर ६० फूट असून त्याच्या विस्तीर्ण शाखा समूहातून ९० वृक्षसमूह तयार झाल्याचे अत्यंत मनोहारी दृश्य इथे पाहायला मिळते.

शहाजीराजांनी राज्यकारभार केलेल्या शहागड किल्ल्याच्या पायथ्याशी हा महावृक्ष उभा आहे. लोकदैवत जाखमत बाबा आणि जाखाई माता या भाऊ-बहिणीच्या समाधिस्थळी पेमगिरी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी याचे जतन केले आहे. किल्ल्याच्या पायथ्यापासून गावठाणापर्यंतच्या घळीत डोंगराच्या विस्ताराशी स्पर्धा करणाऱ्या या महावृक्षाचा इतिहास राज्यातील पर्यावरण संवर्धनात आणि जागतिक जैवविविधता चळवळीत लक्षवेधी अधिवास ठरण्याची ताकद बनून उभा आहे. गरज आहे ती या अमूल्य महावृक्षाचे जतन आणि संवर्धन करण्याची.

भंडारदारा-पेमगिरी-शिर्डी असा पर्यटन त्रिकोण विकसित करू
सह्याद्रीच्या कुशीतील या दुर्मिळ महाकाय वटवृक्षाला मोठी समृद्ध परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र शिर्डी, निसर्गसंपन्न भंडारदरा, संगमनेर, नाशिक परिसरात पर्यटनाला वाव आहे. पेमगिरी व परिसरात महाकाय वटवृक्ष व ऐतिहासिक शहागड असल्याने आगामी काळात शिर्डी, भंडारदरा यासह पेमगिरी हे मोठे पर्यटनस्थळ होईल यासाठी आपला प्रयत्न आहे. - बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री, महाराष्ट्र

महावडाचे जतन आवश्यक
नेमके आयुष्यमान कुणालाच माहीत नाही. पण हा वटवृक्ष किमान ५०० वर्षे जुना असावा. अहमदनगरच्या निजामशाहीत वारसावरून भांडणे सुरू असताना शहाजीराजांनी याच घराण्यातील मूर्तजा नावाच्या मुलाला मांडीवर घेऊन राज्याभिषेक केला व पेमगडावरून निजामशाहीचा कारभार १६३३ ते १६३६पर्यंत इथूनच चालवला. इतिहासाचा साक्षी असलेल्या या महावडाचे जतन करणे गरजेचे आहे. - डॉ संतोष खेडलेकर, इतिहासतज्ज्ञ

शासनाने लक्ष द्यावे
१९९५ पासून आमच्या ग्रामपंचायतीतर्फे या महावृक्षाच्या संवर्धनासाठी पाठपुरावा करत आहोत. यासाठी जागेचे संपादन करण्याची गरज आहे. शासनाने लक्ष घातले तर राज्यातीलच नाही तर देशातील या महत्त्वाच्या निसर्ग चमत्काराचे संवर्धन होऊ शकते.- सोमनाथ गोडसे, सदस्य पेमगिरी ग्रामपंचायत

महत्त्वाचा जैवसांस्कृतिक वारसा
हा वड जैवसांस्कृतिक वारसा आहे. आदिवासी भुतांब्रे कुटुंबीयांनी मालकीच्या क्षेत्रात तो जपला आहे, हे लोकसंवर्धित क्षेत्र परंपरेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. विस्तीर्ण एका वृक्षाची देवराई अतिदुर्मिळ आहे. शास्त्रशुद्ध अभ्यास, संवर्धन गरजेचे आहे. लोकांच्या बेजबाबदारपणामुळे नवीन पारंब्या जमिनीत जात नाहीत. त्या जमिनीत रुजवण्यासाठी मातीचा भराव देऊन आधार देण्याचे काम हाती घ्यावे लागेल. - विजय सांबरे, सह्याद्री जैवविविधता अभ्यासक

अब्जावधी लिटर ऑक्सिजनचा विनामूल्य प्रकल्प!

  • गेल्या ३०० वर्षांत या महावडाकडून २ अब्ज ४६ कोटी ३७ लाख लिटर ऑक्सिजनचा विनामूल्य पुरवठा
  • ९० वृक्षांचा सांभार निर्माण केलेला हा वृक्ष एका वर्षात सरासरी ८२ लाख १२ हजार लिटर ऑक्सिजनची निर्मिती करतो
  • एक वडाचा वृक्ष एका दिवसात २५० लिटर ऑक्सिजन देतो
  • तीनशे वर्षांचे अस्तित्व, ९० शाखांचा अफाट संभार, १३०० सजीवांचा अधिवास, तब्बल दोन एकर विस्तार
बातम्या आणखी आहेत...