आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बनंतर आज अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात जाणार, याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर राज्याचे गृहमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे असलेले दिलीप वळसे पाटील यांच्याकडे गेले.
दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनुभवी नेत्यांपैकी एक मानले जाते. वळसे पाटलांकडे सध्या उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी आहे, पण गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्यावर देण्यात आली आहे. वळसे पाटलांनी शरद पवार यांच्या स्वीय सहाय्यक पदापासून ते कॅबिनेट मंत्रिपदांपर्यंत जबाबदाऱ्या पार पाडल्यात. त्यांनी यापूर्वी कामगार कल्याण आणि उत्पादन शुल्क, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा विभागासारखे अशा महत्त्वाच्या मंत्रीपदांची जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
दिलीप वळसे पाटील यांचा प्रवास...
दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमधील मोठे नाव आहे. त्यांना विधीमंडळाच्या कामकाजाचा मोठा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले आहे. वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला. 1990 साली वडील दत्तात्रेय वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून राजकारणाची सुरुवात केली. दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातव्यांदा आमदार झाले आहेत. 2009 ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.
त्यांनी यापूर्वी, वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ऊर्जा, उत्पादन शुल्क, कामगार विभागासारख्या महत्त्वाचे खात्यांचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्विकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.