आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून अनलॉक:​​​​​​​कोरोना संपलेला नाही, राज्यात मृतांचा आकडा 1 लाख 130 वर; गर्दी, आरोग्याचे नियम मोडलेले चालणार नाही : मुख्यमंत्री

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
रविवारी कडक लॉकडाऊन असतानाही औरंगाबादेतील जाधववाडी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. - Divya Marathi
रविवारी कडक लॉकडाऊन असतानाही औरंगाबादेतील जाधववाडी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती.
  • 17 मार्च 2020 रोजी मुंबईत पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद

राज्यात सोमवारपासून ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद मनपा क्षेत्र, जालना, नांदेड आणि लातूर शहर पहिल्या स्तरात असल्यामुळे या ठिकाणी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मात्र मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अनिवार्य असून औरंगाबाद शहरात व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ ते ४, तर जळगाव जिल्ह्यात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही पहिल्या लाटेच्या तुलनेत मृतांची संख्या जास्त आहे. रविवारी महाराष्ट्रातील कोरोना मृतांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला. देशात कोरोनामुळे सर्वाधिक बळी महाराष्ट्रात नोंदवले गेले आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची नितांत गरज आहे. दरम्यान, कोरोनाचे आव्हान अद्याप संपलेले नाही. राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेऊन अधिक काळजी घ्या व सावध रहा, रात्रच नव्हे तर दिवस देखील वैऱ्याचा आहे असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलिस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतली. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिले.

गर्दी चालणार नाही
नव्या आदेशात वर्गीकरण केले असले तरी कोणत्याही परिस्थितीत कोविडला आमंत्रण देणारी गर्दी , समारंभ, सोहळे चालणार नाहीत. आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन झाले पाहिजे असे जिल्हा प्रशासनाने पाहायचे आहे. दैनंदिन व्यवहार किती उघडायचे, किती काळ सुरू ठेवायचे, त्याच्या वेळा या सर्व बाबी त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवायचे आहे,असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संसर्गाबाबत शंका असेल तर निर्बंध सुरूच ठेवा
कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण लेव्हल्स ठरविल्या असल्या तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला , कुठल्याही दबावाला बळी पडू नका. निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनाना दिला आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून या निकषांच्या आधारे निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे,असे मुख्यमंत्री म्हणाले.

१७ मार्च २०२० रोजी मुंबईत पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद
राज्यात कोरोना बळींची संख्या १ लाख १३० झाली. राज्यात ९ मार्च २०२० रोजी पहिला रुग्ण आढळला होता. तर गतवर्षी १७ मार्च २०२० रोजी राज्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली होती. दुबईहून परतलेल्या ६५ वर्षीय वद्धाचा मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर ४४७ दिवसांत बळींची संख्येने एक लाखांची संख्या ओलांडली. म्हणजेच दररोज सरासरी २२४ मृत्यू झाले. यामध्ये सर्वाधिक १४ हजार ९७१ मृत्यू एकट्या मुंबईत झाले. राज्याचा मृत्युदर १.७२ टक्के अाहे.

  • दरराेज सरासरी २२४ मृत्यू
  • 447 दिवसांत 1 लाख मृत्यू

भारतासह ७ देशात १ लाख मृत्यू
जगात सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत (६,१२,२०३ ) झाले आहेत. त्यानंतर ब्राझील (४,७२,६२९ मृत्यू), भारत (३,४९,२२७ ), इंग्लंड (१,२७,८३६), इटली (१,२६,४७२ मृत्यू), रशियात (१,२३,४३६ ) आणि फ्रान्स (१.०९) लाख मृत्यूंची नोंद झाली आहे. भारताच्या सुमारे साडेतीन लाख बळींमध्ये १ लाख महाराष्ट्रातील आहेत.

दिव्य मराठी एक्स्पर्ट | स्वातंत्र्य मिळाले म्हणून गैरवापर नको, मास्कशिवाय कुठेही फिरू नका
सोमवारपासून औरंगाबादसह राज्यभरात पुन्हा व्यवहार सुरू करण्यात येणार आहेत. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवले आहे. मास्क घालणे, हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे ही त्रिसूत्री काेराेनाच्या लढ्यात महत्त्वाची ठरलेली आहे. हेच नियम पाळत आगामी तीन महिने आपल्याला वागावे लागेल. पुढचे किमान तीन महिने मास्कशिवाय कुठेही फिरू नका. तरच आपण या महामारीला अटकाव करू शकताे. सध्या युरोपमध्ये तिसरी लाट आलेली आहे. त्याचे भान ठेवा. अनलाॅकमुळे आपल्याकडे स्वातंत्र्य मिळाले म्हणून अनिर्बंध वागू नका. अन्यथा तिसरी लाटेपासून काेणीही आपले संरक्षण करू शकणार नाही. गरज असेल तेव्हाच बाहेर पडा. जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून घ्या. - डॉ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

सण-उत्सवानंतर दुसरी लाट
गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण-उत्सवानंतर वाढला होता. यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरं म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे. नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहण्याचा धोका आहे.

बातम्या आणखी आहेत...