आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील टिळक राष्ट्रीय विद्यालयाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी २८ डिसेंबर १९३३ मध्ये भेट देऊन चरख्याचे उद्घाटन केले होते. ‘यहाँ के शिक्षक पारमार्थिक रूप से काम करते है, यह देख कर मुझे बडी खुशी हुई,’ असे म्हणत गांधीजींनी स्वहस्ते अभिप्राय नोंदवत संस्थेचे कौतुकही केले होते. त्या वेळी कलाचार्य पंधे गुरुजी उपस्थित होते.
स्वदेशी वस्त्राला चालना देण्यासाठी त्यांनी प्रेरणादायी व राष्ट्रीय भावनात्मक विचार प्रगट केले ही बाब खामगावकरांच्या दृष्टीने ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण घटना आहे.
स्वातंत्र्य, स्वदेशी, बहिष्कार व स्वराज्य या लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्रीवर आधारित या संस्थेची स्थापना लालचंद पुरवार व पुरुषोत्तम एकबोटे यांनी २४ जानेवारी १९२१ रोजी केली होती. या विद्यालयास भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी अशा थोर नेत्यांनी भेटी देत संस्थेच्या कार्याचे कौतुकही केले होते. त्यांनी या विद्यालयाबाबत लेखी अभिप्रायही नोंदवले आहेत. ते संस्थेने आजही जतन करून ठेवलेले आहेत.
हे विद्यालय ऐतिहासिक केंद्र व्हावे म्हणून अनेक वर्षांपासून विविध स्तरावर मागणी सुरू आहे. परंतु याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. विद्यालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहात ग्रामीण व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जात होते. गीताई, सफाई, कताई, जुनाई इत्यादी प्रकारचे मुलोद्योग जीवन प्रणालीचे शिक्षण दिले जात होते. देशाच्या सेवेसाठी बलशाली युवक घडावे व देशाला स्वातंत्र्य मिळावे हा संस्थेचा मुख्य उद्देश होता. म्हणूनच मिठाचा सत्याग्रह असेल, गोवामुक्ती चळवळ अशा अनेक चळवळीत या विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी हिरीरीने भाग घेत असत. याचेही गांधीजींनी कौतुक केले होते.
महात्मा गांधीजींच्या स्वहस्ताक्षरातील अभिप्राय आजही संस्थेने जतन करून ठेवला आहे. आजही हा अभिप्राय आपल्याला पाहायला मिळू शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.