आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mansoon Updates: Water Only In Sangli, Satara, Kolhapur; Three Buffaloes Were Swept Away In Virar; News And Live Updates

राज्यात "जल’ धारा:सांगली, सातारा, कोल्हापुरात पाणीच पाणी; विरारमध्ये तीन म्हशी वाहून गेल्या, पिंपरी-चिंचवडसह कोकणातही धुवाधार पाऊस

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक झाली ठप्प

जिल्ह्याच्या पश्चिम भागात बुधवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सातारा - महाबळेश्वर रस्त्यावर केळघर घाटात तसेच महाबळेश्वर - तापोळा रस्त्यावर दरड कोसळली आहे. तर उंब्रजजवळील कोरोना विलगीकरण कक्षाच्या आवारात मांड नदीला पूर आल्याने पाण्याचा वेढा पडला आहे. उंब्रजमधील काही घरांत पाणी शिरले आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस अजूनही सुरूच आहे. सातारा येथून महाबळेश्वरला केळघर मार्गे जाणारी वाहतूक दरड कोसळल्यामुळे धिम्या गतीने सुरू आहे. तर महाबळेश्वर - तापोळा रस्त्यावर सुद्धा दरड कोसळल्याने तेथील वाहतूकही बंद करण्यात आलेली आहे.

इस्लामपूर तालुक्यात १३० मिमी पाऊस
सांगली | बुधवारी रात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी सायंकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नद्या, नाल्यामधील पाण्याची पातळी वाढली असून जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. बुधवारी रात्री १० च्या सुमाराला सुरू झालेल्या या संततधार पावसाने आज सकाळी ८ वाजेपर्यंत उसंतच घेतली नाही. अवघ्या ३ ते ४ तासांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा जोर धरला. शहरातील सखल भागांत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. इस्लामपूर तालुक्यात १३० मिलिमीटर तर सांगली १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शिराळा, पलूस, कडेगाव मिरज तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखीन २ दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

माजगावचा रस्ता वाहून गेला
चंद्रे आणि माजगाव गावांच्या दरम्यान असलेला रस्ता पहिल्याच पावसाने वाहून गेला. यामुळे गारगोटी- कोल्हापूर वाहतूक पूर्णपणे बंद झाली. या मार्गावर ओढ्यावरील पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. दरम्यान, पहिल्याच मुसळधार पावसामुळे हा रस्ताच वाहून गेला. परिणामी या मार्गावरील वाहतूक बंद झाली. याचा परिणाम दुधाचे टँकर आणि भाजीपाला वाहतुकीवर झाला आहे.

पुणे, रत्नागिरीत जोरदार
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात सायंकाळच्या सुमाराला पावसाने काही भागात दमदार हजेरी लावली. तर विरारमध्ये पुराच्या पाण्यात ३ म्हशी वाहून गेल्या. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत सासुपाडा परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी साचले. रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार पाऊस झाला. सिंधुदुर्गात ४ दिवसांपासून पाऊस सुरूच असून धरणे काठोकाठ भरली आहेत.

पंचगंगेची पातळी ३० फुटांवर
जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. एक दिवसाच्या पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी ३० फुटांवर पोहोचली आहे. जिल्ह्यातील ५५ बंधारे पाण्याखाली गेले असून एक दिवसात पाणीपातळी १७ फुटांनी वाढली आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, असाच पाऊस कायम राहिला तर कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. बुधवारी पहाटेपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत कायम होती. पंचगंगेवरील कसबा बावडा राजाराम बंधाऱ्यावरील रस्ताही बंद करण्यात आला.

कराड : उंब्रज येथील मांड नदीच्या पाणीपातळीमध्ये प्रचंड वाढ झाली.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणाची पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. संध्याकाळी पाच वाजता कोयना धरणाचा पाणीसाठा ३३.३१ टीएमसी इतका होता आणि कोयना नदीपात्रातून कोयना धरण पाणीसाठ्यात ४१९२९ क्युसेक इतकी आवक सध्या आहे.

बातम्या आणखी आहेत...