आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maratha Leaders Do Not Have The Mentality To Get Reservation, Chandrakant Patil Alleges; Name The Maratha Leaders Who Do Not Want Reservation, Ashok Chavan's Challenge

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण:आरक्षण मिळावे अशी मराठा नेत्यांची मानसिकता नाही, चंद्रकांत पाटील यांचा आरोप; आरक्षण नको असलेल्या मराठा नेत्यांची नावे सांगा, अशोक चव्हाणांचे आव्हान

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार आणि अशोक चव्हाण यांची झाली बैठक

मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मराठा नेत्यांची मानसिकता कधीच नव्हती. म्हणूनच इतकी वर्षे सत्तेत असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. समाजातील गरिबांना आरक्षण मिळू नये असे राज्यातील श्रीमंत मराठा लोकांना वाटते. कारण आरक्षण मिळाल्यास राज्यातील श्रीमंत आणि मोठ्या मराठ्यांच्या नावापुढेही ‘बॅकवर्ड’ शब्द लागेल अशी भीती त्यांना वाटते, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

मराठा समाज गरीब राहील तेवढे तो मोठे नेते सांगतील त्याप्रमाणे वागेल. या नेत्यांना अशी माणसेच पाहिजे आहेत. परंतु राज्यातील मराठ्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. आरक्षण नसेल तर शिक्षण नाही, शिक्षण नसेल तर नोकरी नाही, नोकरी नसेल तर आर्थिक स्थिती सुधारणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजासाठी पंधराशे कोटी रुपये मंजूर करावेत, असे पाटील म्हणाले.

आरक्षण नको असलेल्या मराठा नेत्यांची नावे सांगा - अशोक चव्हाणांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान

मराठा आरक्षण नेमके कोणत्या कोणत्या मंत्र्यांना नको आहे, त्या मंत्र्यांची नावे पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजेत, असे आव्हान मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले. तसेच रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एक आवाज यावा, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अशोक चव्हाण यांनी दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली. या बैठकीला जलसंपदा मंत्री जयंत पाटील हजर होते. शरद पवारांसोबत मराठा आरक्षणाविषयी कायदेशीर बाबींवर चर्चा झाली. तसेच याप्रकरणी मागच्या तीन बैठकांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जी चर्चा झाली होती त्याची माहिती पवार यांना दिली, असे चव्हाण यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...