आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Maratha Reservation Updates: New Political Equations In The State On The Issue Of Reservation; News And Live Updates

मराठा आरक्षण:​​​​​​​आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात नवी राजकीय समीकरणे; खासदार संभाजीराजे - भाजपमध्ये तीव्र मतभेद

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवीनपक्ष स्थापण्याची शक्यता नसल्याचे निकटवर्तीयांचे मत
  • आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारीची चाचपणी

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेऊन राज्यभर दौरा करत असलेले कोल्हापूर राजघराण्याचे वारसदार संभाजीराजे भोसले नवीन पक्ष स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच कोल्हापुरातील राजकीय समीकरणे पाहता ते आगामी लोकसभा लढवतील, तीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद््द्यावर संभाजीराजे सध्या महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. त्यांनी शरद पवार ते राज ठाकरे अशा सर्व राजकीय पक्षप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या.

शनिवारी पुण्यात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्या वेळी बहुजन समाजाचे नेतृत्व संभाजीराजेंनी करावे, असे अॅड. आंबेडकर म्हणाले. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात आता नवी समीकरणे आकारास येत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे नवा पक्ष स्थापन करणार का? आणि त्यांनी पक्ष स्थापन केल्यास त्याचा फायदा भाजपला मिळणार की राष्ट्रवादीला याविषयीही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. वर्ष २०१८ मधील मराठा क्रांती मोर्चादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संभाजीराजे यांची जवळीक झाली.

पुढे भाजपने त्यांना राष्ट्रपती नामनियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवले. तरी कोल्हापूरचेच असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी संभाजीराजे यांचे बिलकुल सख्य जुळले नाही. संभाजीराजे यांनी अद्याप भाजपचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही, हे उल्लेखनीय. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्द्यावर संघर्ष न करता महाविकास आघाडी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेण्याची संभाजीराजेंची भूमिका भाजपला अमान्य असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याने संभाजीराजे भाजपपासून दूर जात असल्याचेही संकेत मिळत आहेत.

मात्र, संभाजीराजे शांत व संयमी आहेत. मात्र त्यांना राजकीय अनुभव नाही, पक्ष स्थापून तो चालवण्याचा त्यांचा आवाका नाही. ‘बहुजन समाजाची इच्छा असेल तर नवा पक्ष स्थापन करेन,’ असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तरी ते स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करतील, अशी शक्यता नसल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तसेच संभाजीराजे यांची तशी कोणतीही तयारी नाही, असेही सांगण्यात आले.

संभाजीराजे यांना भाजपमध्ये जाण्यास त्यांना घरातून विरोध आहे. भाजपत जाण्याने घराण्याच्या वैचारिक वारशांशी फारकत घेणे होय, असे त्यांचे कुटुंबीय मानतात. विदर्भ, मराठवाड्यात त्यांना मानणारा तरुण वर्ग मोठा आहे. हाच वर्ग संभाजी ब्रिगेडच्या मागे होता. त्याच्या जोरावर ब्रिगेडने राजकीय पक्ष स्थापला, तरी पाठिराख्यांचे मतांत परिवर्तन झाले नव्हते. त्यामुळेच संभाजीराजे भाजपपासून जरी दूर जात असले तरी ते स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी सुतराम शक्यता नाही, असे सांगितले जाते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते वर्ष २०२४ची लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असाही दावा निकटवर्तियांनी केला.

खासदार संभाजीराजेंची सौम्य भूमिका भाजपला अमान्य : चंद्रकांत पाटील
मुंबई-कोल्हापूर | मराठा आरक्षणासाठी कोणता मार्ग हाताळायचा यावरून भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती आणि भाजपमध्ये तीव्र मतभेद असल्याचे रविवारी समोर आले. कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण मिळावे, मराठा समाजाला सवलती मिळाव्यात यासाठी जी व्यक्ती संघर्ष करेल तिच्याबरोबर आम्ही आहोत. संभाजीराजे हे आमचे राजे आहेत. राजे आरक्षणासाठी आग्रही आहेत. मात्र संघर्ष न करता आरक्षण मिळावे अशी त्यांची भूमिका आहे.

आरक्षणासाठी संघर्ष करायचा की नाही हे कोविड संपल्यावर बघू, असे त्यांनी सांगितले आहे. हे आम्हाला मान्य नाही. संभाजीराजेंच्या मागण्यांना भाजपचा पाठिंबा आहे. पण त्यांची कृती आघाडी सरकारला सहकार्य करण्याची असेल आणि कोविडमुळे शांत बसण्याची असेल तर भाजपला ती मान्य नाही. त्यांची कृती सरकारच्या मानगुटीवर बसून आरक्षण घेण्याची हवी, तरच आम्ही त्यांच्यासोबत लढू, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

नवा पक्ष स्थापण्याचा प्रश्न वैयक्तिक
संभाजीराजे छत्रपती यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचे आणि खासदारकीचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहेत. त्यावर पाटील यांना विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर बोलण्याची गरज नाही,’ असे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...