आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र-राज्य सरकारला इशारा:मराठा आरक्षण मिळेपर्यंत गप्प बसणार नाही, 16 जूनपासून आंदोलनास प्रारंभ : संभाजीराजे

रायगड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संभाजीराजेंशी मतभेद नाहीत : खासदार उदयनराजे भोसले

मराठा आरक्षण मिळेपर्यंत मी गप्प बसणार नाही. यासाठी १६ जूनपासून अांदाेलनास प्रारंभ करणार असून या वेळी पहिली लाठी झेलण्यास मी पुढे असेन, असा इशारा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी रायगडावरून बोलताना दिला. किल्ले रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. या वेळी त्यांनी राज्यकर्ते आणि विरोधी पक्षांवरही तोफ डागली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. यामध्ये मराठा समाजालाही सामावून घेतले. मग आता बहुजन समाजातून मराठा समाज का वगळला गेला? मराठा समाजाला आरक्षण मिळणे हा हक्क आहे. तुमच्या भांडणाचे आम्हाला काही सोयरसुतक नाही. आरक्षण कसे देणार ते सांगा, असे त्यांनी केंद्र व राज्य सरकारला बजावले.

आता संयम नाही
मराठा आरक्षणासाठी संयमी स्वभाव सोडेन. न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. १६ जून रोजी कोल्हापुरात पहिले आंदोलन होईल. न्याय न मिळाल्यास कोरोना संपल्यानंतर हा समाज पायी मुंबईवर चाल करेल. या वेळी पहिली लाठी झेलण्यास मी पुढे असेन, असा इशारा त्यांनी दिला.

संभाजीराजेंशी मतभेद नाहीत : खासदार उदयनराजे भोसले
सातारा | मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आता राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका लवकरात लवकर जाहीर करावी, अशी मागणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात जलमंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उदयनराजे यांनीही मराठा आरक्षणासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. मराठा समाजातील लोक लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे उद्या उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील, असे ते म्हणाले.

तुमच्या भांडणात आम्हाला रस नाही, पर्याय द्या
राज्यकर्ते आणि विरोधी पक्षाचे नेते मराठा समाजाला वेठीस धरत आहेत. ५५ वर्षे मराठा समाज आरक्षणपासून वंचित आहे. मात्र, राजकारणी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. कोणीही या समाजाला आरक्षण कसे देणार यावर पर्याय देत नाहीत. आम्ही दिलेल्या पर्यायाचा विचार करत नाहीत. त्यामुळे तुमच्या भांडणात आम्हाला काहीही रस नाही. आरक्षण कसे देणार हे स्पष्ट करा, असे खा. संभाजीराजे म्हणाले. किल्ले रायगडावर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवराज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.

बातम्या आणखी आहेत...