आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळत असल्याने काहीसे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आता कोरोना लसीकरणाची मोहीमेला अधिक गती देणे गरजेचे झाले आहे. आतापर्यंत नागरिकांना लसीकरणाचे आवाहन केले जात होते. मात्र, आता येथून पुढे घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहे. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
ही तर ओमायक्रॉनची सुरुवात असून, नागरिकांनी सतर्क राहून स्वत:ची व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी. राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले तरीही नागरिक घाबरताना दिसत नाही, मास्कचा वापर करत नाहीत. त्यामुळे आता कडक धोरणे अवलंबून लसीकरण पुर्ण करून घेणे हेच सरकारचे उद्दिष्ट असल्याचे पवार म्हणाले. विविध विकास कामाच्या उद्घाटनासाठी ते लातूर जिल्ह्यातील औसा येथे आले होते. या दरम्यान, त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकही घेतली.
ऊसतोड कामगारांचे लसीकरण
सध्या ऊस गाळपाचा हंगाम सुरू झाला आहे. मराठवाड्यातील अनेक ऊसतोड मजूर हे कारखान्यावर दाखल झाले आहेत. त्यांची माहिती घेऊन त्यांचेही लसीकरण पूर्ण केले जाणार आहे. सध्या ‘ओमायक्रॉन’ची सुरवात झाली असून, पहिल्या टप्प्यात तो सौम्य स्वरुपात असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. यापासून अधिकचा धोका नाही.
त्यासंबंधी जनजागृती करणेही आवश्यक असल्याचे अजित पवारांनी या बैठकीत सांगितले आहे. लसीकरण हे बऱ्यापैकी झाले आहे. मात्र, काहीजण हे लसीकरण करू शकलेले नाहीत. यामध्ये ऊसतोड मजूर अधिक आहेत. त्यांची माहिती एकत्रित करून ऊसतोड मजूर व इतर कामगार यांचेही लसीकरण पूर्ण करून घेतले जाणार आहे.
लसीकरणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना
लातूरकरांनी लसीकरण करून घ्यावे, याकरिता वेगवेगळे पर्यांय महानगरपालिकेने राबवलेले आहेत. आता नव्यानेच ज्या नागरिकांकडे लसीकरणाचे प्रमाणपत्र नाही त्यांना रेल्वेचे तिकीट दिले जाणार नसल्याचा फतवा काढण्यात आला आहे. शिवाय खासगी वाहनांमध्ये प्रवाशाने मास्क नाही घातला तर दंड हा वाहनचालकास भरावे लागणार आहे, असाही नियम घालण्यात आला आहे.
आता मात्र, घरोघरी जाऊनच लसीकरण हाच पर्याय आहे. लातूरच नाही तर प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये असाच उपक्रम राबवावा लागणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.