आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्याचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल ट्विटरवर भावनिक पोस्ट शेअर करून आदरांजली वाहिली आहे. तसेच शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
त्यावर आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भाष्य केले आहे. आपले भाऊ धनंजय मुंडे यांचे नाव न घेता पंकजा मुंडे यांनी निशाणा साधला. वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून गरिबांच्या पोटाची भुक शमणार आहे का? असा सवाल पंकजा यांनी केला आहे.
"स्वतःचा वाढदिवस आणि आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करताना भव्यदिव्यता दाखवून सामान्य लोकांना काय मिळणार? खूप मोठी प्रतिकृती बनवली, पेंटिंग्ज केले म्हणजे गरिबांच्या पोटाची भूक शमणार आहे का? हे आमच्या मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत", असे म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर टीकास्त्र केले आहे.
पुढे पंकजा म्हणाल्या की, "किती मोठ्या कमानी लावल्या, कितीही मोठ्या रांगोळ्या काढा, किती मोठे कटआउट लावले, जाहिराती दिल्या, त्यात गरिबाला काय मिळाले? याचा विचार करावा." असे मत पंकजा मुंडे यांनी मांडले आहे.
"आजचा दिवस हा समर्पित केलेला आहे. सेवा, योजनासाठी, सेवेचा मी संकल्प केला आहे. आतापर्यंत गोपीनाथ गडावर देशाचे-राज्याचे मान्यवर नेते येऊन गेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील येऊन गेले. पक्षाचा कुठलाही भेदभाव गडावर नाही. दरवर्षी गोपीनाथ गडावर गरिबातील गरीब माणसे येतात.
मात्र यावर्षी आम्ही गोपीनाथ गड गावागावात घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. गोपीनाथ गड शेतकऱ्यापर्यंत, वीट भट्टी, खडी फोडणाऱ्यापर्यंत घेऊन जाऊया. मी आज ऊसतोड कामगारांच्या फडात जावून त्यांच्यासोबत ऊस कसे तोडतात? कसे कष्ट करतात, हे आज पाहणार आहे. स्वयंपाक तयार करुन घेतला आहे. त्यांच्यासोबत आम्ही जेवण करणार आहोत" असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंडेंच्या जयंतीत शरद पवार सामील
"सन्माननीय शरद पवारांचा आज वाढदिवस आहे. त्यांनादेखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! गोपीनाथ मुंडेंच्या नगरीत शरद पवारांचे मोठमोठे बॅनर लागले. मुंडेंच्या जयंतीत शरद पवार सामील झाले असे वाटत आहे", असे पंकजा मुंडे म्हणाल्या. "गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची प्रतारणा ज्यावेळेस पंकजा मुंडे करील त्यावेळेस या मंचावर तुम्ही मला उभे राहू देणार नाहीत, याचा मला विश्वास आहे.
मुंडेंच्या विचारांची प्रतारणा होईल असे काम मी कधीही करणार नाही. सत्तेच्या खुर्चीवर बसून पराभव पंचवला. विरोधी पक्षनेत्या बाकावर बसून पाहिले. राज्यात-देशात फिरले. सगळ्यात मोठी श्रीमंती गोष्ट म्हणजे मुंडे साहेबांचा वसा आणि वारसा आहे. याचा आनंद मला खूप मोठा आहे. मी आज ऊसतोड मजूराचे फडात लसीकरण मोहीम करणार आहे. भव्यता दाखवताना सामन्यात उतरले पाहिजे", असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, आज गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार नमिता मुंदडा यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.