आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:ड्रग्ज निर्मितीसाठी मोक्याचा ‘स्पॉट’; मध्य प्रदेश, आंध्र, तेलंगणात वाहतुकीसाठी सोयीस्कर जागेची निवड

नांदेड / शरद काटकर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर, तेलंगणाला जाणाऱ्या महामार्गावर कारखाना थाटला होता. - Divya Marathi
नागपूर, तेलंगणाला जाणाऱ्या महामार्गावर कारखाना थाटला होता.

नांदेडच्या सीमेवर ११ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला. त्यानंतर लगेच २३ नाेव्हेंबरला नांदेड शहरात तीन ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त केले गेले. मुंबईच्या अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) कारवाई केल्यानंतर अमली पदार्थाच्या निर्मितीबाबत नांदेडचे नाव देशभरात चर्चेत आले. इतकी वर्षे कारखाना सुरू असताना याची माहिती स्थानिक पोलिसांना कशी झाली नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, नांदेडच्या मालटेकडी भागात कामठा येथे निर्मिती केल्या जाणाऱ्या अमली पदार्थाची ने-आण तेलंगणा, आंध्र प्रदेश, नागपूरमार्गे मध्य प्रदेशात करण्यासाठी आरोपींनी मोक्याची जागा निवडल्याचे समोर आले आहे.

अमली पदार्थ बनवण्यासाठी उभारलेला कारखाना नांदेड शहराच्या पूर्वेस अवघ्या ५ किमी अंतरावर मालटेकडी रस्त्यावर शहरापासून बाहेर निर्मनुष्य ठिकाणी, जेथे ट्रान्सपोर्टच्या वाहनांची वर्दळ असते अशा ठिकाणी आहे. त्यामुळे आतापर्यंत कुणालाही संशय आला नाही. बाजूलाच गॅरेज असल्याने तेथे कायम वाहने थांबलेली असतात. हा कारखाना जेथे आहे तो भाग नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर आहे. हाच महामार्ग पुढे भोकर फाट्यापासून तेलंगणाकडे जातो. त्यामुळे अमली पदार्थाची वाहतूक शेजारील राज्यात करणे सहज शक्य होते. आसना पुलापासून १२ ते १५ किमी अंतरावर महामार्ग पोलिस चौकी आहे.

पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना
एनसीबीच्या पथकाने नांदेड शहरातील कामठा परिसरात कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक पोलिसांना हस्तक्षेप करता येत नाही. हा त्यांचा तपासाचा भाग असतो. स्थानिक पोलिसांना अलर्ट राहून अशा पद्धतीची कारवाई करण्याची सूचना दिली आहे. - नीलेश मोरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नांदेड.

गांजा प्रकरणाचे धुळे कनेक्शन, अनिल टकलू हाच मास्टरमाइंड
मुंबईच्या अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) गेल्या आठवड्यात नांदेडच्या सीमेवर ११ कोटी रुपयांचा ११२१ किलो गांजा जप्त केला. हा गांजा जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात येणार असल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. या प्रकरणात धुळ्यात राहणारा अनिल टकलू हा व्यक्ती मास्टरमाइंड असल्याचेही तपासात समोर आले.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, नांदेड येथील अमली पदार्थांच्या तस्करीत आंध्र प्रदेशाचा थेट संबंध आहे. तेथील नक्षल चळवळीचा भाग असलेल्या प्रदेशातूनच हा गांजा पाठवण्यात आला होता आणि तो जळगाव जिल्ह्यातील एरंडोलला पाठवण्यात येत होता. दरम्यान, पोलिसांना सुगावा लागल्याने तो नांदेडला अडवून जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...