आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यान्ह भोजन योजना:फक्त दोनशे रुपयांसाठी 1.03 कोटी विद्यार्थ्यांना काढावे लागेल बँक खाते

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • मध्यान्ह भोजन योजनेत उन्हाळी सुटीमधील धान्याऐवजी देणार रक्कम

राज्यात केंद्र शासनाच्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये उन्हाळी सुटीतील दिवसांसाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर धान्याची रक्कम जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १.०३ कोटी विद्यार्थ्यांना बँकेत खाते काढावे लागणार आहे. राज्यात केंद्र शासनाकडून विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत तर इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन दिले जाते.

त्यासाठी तांदूळ, डाळ व इतर धान्याचा पुरवठा शासनाकडून केला जातो. तर भाजीपाला व इंधन आणण्याची जबाबदारी पोषण आहार शिजविणाऱ्या बचत गटांकडे आहे.

दरम्यान, कोविडमुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांना धान्याच्या स्वरूपात पोषण आहाराचे वाटप केले आहे. त्यानंतर आता उन्हाळी सुटीमधील धान्य वाटप झाले नाही. त्यामुळे त्या ऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात धान्याची रक्कम देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक लाभार्थी विद्यार्थ्याचे बँक खाते काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पोषण आहाराच्या लाभार्थींची संख्या १.०३ कोटी आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना बँक खाते काढावे लागणार आहे. त्यामुळे बँकांमधून खाते काढण्यासाठी विद्यार्थ्यांचीच गर्दी होणार आहे. दरम्यान, राज्याच्या शालेय पोषण आहार विभागाने शिक्षण विभागाकडे विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक एकत्रित करून देण्याचे पत्र काढले आहे.

दरम्यान, कोविडची तिसरी लाट येण्याची भीती शासनाकडूनच व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम बालकांवर होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. बँकेत खाते काढण्यासाठी गर्दी होणार असल्याचे चित्र आहे. मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातच रक्कम जमा करण्याचा आग्रह का धरला जात आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे नेमके किती दिवसांचे पैसे द्यायचे याबाबत केंद्र शासनाकडून स्पष्ट सूचना आल्या नसल्या तरी किमान ४० दिवसांच्या धान्याचे पैसे मिळणार आहेत. त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना केवळ २०० रुपये मिळणार असून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ३०० रुपये मिळणार आहेत. दोनशे व तीनशे रुपयांसाठी विद्यार्थ्यांना कोरोनाच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून बँक खाते काढावे लागणार आहे.

शिक्षक संघटनांचा विरोध : विद्यार्थ्यांचे बँक खाते काढून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास शिक्षक संघटनांकडून विरोध केला जात आहे. विद्यार्थ्यांना पैसे देण्याऐवजी कोरड्या स्वरूपात धान्यच द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भातील निवेदनांचा पाऊस शालेय पोषण आहार विभागाच्या संचालक कार्यालयाकडे पडला आहे.

पालकांच्या खात्यावर पैसे जमा करावेत
राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाचे बँकेत खाते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याच बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा आग्रह धरण्या ऐवजी पालकांच्या बँक खात्यात पैसे जमा केले पाहिजेत. सध्या विद्यार्थ्यांना बँकेत घेऊन जाणे जिकिरीचे असल्याने शासनाने यासंदर्भात योग्य निर्णय घेतला पाहिजे. - सुभाष जिरवणकर, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ.

बातम्या आणखी आहेत...