आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारचा कारभार पाहिला तर सरकारपेक्षा इंग्रज बरे होते अशी म्हणण्याची वेळ आली आहे असल्याचे म्हटले आहे. तर याला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. सध्या राज्यातील ठाकरे सरकारचाच कारभारच इंग्रजांसारखा असल्याचे मत दरेकर यांनी व्यक्त केले आहे.
कोर्टाची ठाकरे सरकारला चपराक
राज्यातील ठाकरे सरकारला कोर्टाने पुन्हा एकदा चांगलीच चपराक दिली आहे. राणा दांपत्य यांच्यावर लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. महाविकास आघाडी सरकारची मनमानी कोर्टाने जनतेसमोर उघड केली असल्याचे देखील दरेकर म्हणाले. नारायण राणे, गणेश नाईक, मोहित कंबोज तसेच माझ्यावर देखील ठाकरे सरकारने अशाच प्रकारे गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, यातील एकही गुन्हा न्यायालयात टिकू शकला नाही, असे देखील दरेकर म्हणाले. ही सरकारची बेधुंदशाही असल्याची टीका दरेकर यांनी केली.
राज्य सरकारची प्रतिमा पूर्णतः मलीन
एका दलित खासदार महिलेला विनाकारण बारा दिवस जेलमध्ये टाकण्यात आले. न्यायालयाच्या निरीक्षणानंतर आता हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा जनतेमध्ये पूर्णतः मलीन झाली असल्याची टीका दरेकर यांनी केली. खासदार राणा यांची प्रकृती पाहता हे चित्र हृदय हेलावून सोडणारे असल्याचे दरेकर म्हणाले. ठाकरे सरकारचा हा अहंकारी कारभार ब्रिटिशांना साजेसा असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
परप्रांतीयांचे योगदान आहेच
मुंबईसह महाराष्ट्राच्या विकासामध्ये परप्रांतीयांचे योगदान असल्याचे कोणीही नाकारत नाही. तसेच ते नाकारण्याचा प्रश्नही नाही. या माध्यमातून राज ठाकरे आणि भाजप यांच्यात फक्त वाद लावण्यासाठी सदरील विधाने केली जात असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.
राऊत यांनी या प्रश्नाचे उत्तर द्यावे
राज ठाकरे असो किंवा इतर नेते यांच्यावरील दहा किंवा पंधरा वर्ष जुनी प्रकरणी काढून त्यांना त्रास दिला जातोय. याला कोणती राजवट म्हणायची? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. याला इंग्रजी राजवट नाहीतर काय म्हणतात असे देखील ते म्हणाले.
राज ठाकरे कारवाईचा विचार करत नाही
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावर राज्य सरकारने काहीही कारवाई केली तरी, त्याची पर्वा ते करणार नाहीत. पर्वा न करता त्यांची जी भूमिका घेतली ती महत्वाची आहे. त्यामुळे अशा कारवाई होत असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
आधीच भूमिका स्पष्ट केली
उत्तर भारतीय नागरिकांबद्दल राज ठाकरे यांनी आधी भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे त्या मध्ये आता कोणताच विषय राहत नाही. असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.