आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी रोजी जन्मदिवस असतो. त्यांच्या जयंती निमित्त 'मराठी भाषा दिन' साजरा केला जातो. कुसुमाग्रजांना साहित्य विश्वातला मानाचा 'ज्ञानपीठ पुरस्कार' प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्टार नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राती जनतेसाठी एक खास पत्र लिहीले आहे.
'भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे...' कुसुमाग्रजांना स्मरून 'मराठी भाषा दिनाच्या' पूर्वसंध्येला महाराष्ट्राला विनम्र आवाहन.#मराठीराजभाषादिन #मायमराठी #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/CsRPkt2Yhp
— Raj Thackeray (@RajThackeray) February 26, 2021
राज ठाकरे यांचे पत्र...
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला लिहिलेलं पत्र वाचा जसंच्या तसं…
माझ्या तमाम मराठी बंधू-भगिनींना सस्नेह जय महाराष्ट्र…
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका।।
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका।।
हे तळमळीने सांगणाऱ्या आपल्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस, २७ फेब्रुवारी… आपण सारे जण ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करतो. सरकारी कॅलेंडरमधले जसे अनेक दिवस निरसपणे साजरे केले जातात तसा हा दिवस पण साजरा केला जात होता. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायला सुरुवात केल्यावर आपल्या मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस सर्वांच्या स्मरणात राहू लागला. आणि अर्थातच ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे.
मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे 358 दिवस ह्या सगळ्याचा विसर पडेल. मुळात मराठीचं काय होणार ह्या पेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल ह्याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणं हे जास्त महत्वाचं आहे.
आपली मराठी भाषा ही इतकी लेचीपेची अजिबात नाही की जिच्यासाठी आसवं गाळत बसावी. ही भाषा कोणाकोणाच्या मुखातून निघाली आहे ह्याचा विचार केला तर ही भाषा किती सशक्त आहे हे तुमच्या लक्षात येईल. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखी असलेली ही भाषा, संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून ते समर्थ रामदासस्वामींच्या मुखी असलेली ही भाषा, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ‘ म्हणत भारतीयांच्या मनात स्वराज्याचं बीज रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांची ही भाषा, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुखी असलेली ही भाषा, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची हीच मातृभाषा, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, इतकंच काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार असोत की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगेंची पण हीच मातृभाषा.
लता दीदींच्या आणि आशा ताईंच्या गोड गळ्यातून पहिले शब्द जे निघाले ते ह्याच भाषेतले आणि १८४३ पासून आजपर्यंत अव्याहतपणे ज्या रंगभूमीने जागतिक रंगभूमीला देखील दखल घ्यायला लावली ती देखील मराठी रंगभूमीच. भारत व्यापून टाकणारं कार्य करणारी ८ भारतरत्नही ह्या भूमीतीलच.
ह्या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला, ह्या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला, ह्या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला विचार दिला अशा भाषेचं काय होईल ह्याची चिंता करण्यापेक्षा, आपल्या भाषेचं संचित स्मरून, इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत आणि ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो, तरी पुरेसं आहे.
मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरु करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखाशाखांमध्ये फलक लावलेले असतील, त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा.
तुम्हा सर्वाना मराठी राजभाषा दिनाच्या मनापासून शुभेच्छा.
जय हिंद जय महाराष्ट्र !
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.