आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी-ठाकरे भेट:कांजूर कारशेड, मेट्राे प्रश्न मार्गी लागण्याची शिवसैनिकांना अाशा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवे राजकीय समीकरण नाही, मेट्रोच्या मोबदल्यात बुलेट ट्रेनला सहकार्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्ये मंगळवारी शिष्टमंडळाव्यतिरिक्त ३० मिनिटे बंदद्वार चर्चा झाल्याने शिवसैनिकांत आनंदाचे वातावरण आहे. शिवसेनेसाठी अत्यंत कळीचा ठरलेला कांजूरमार्ग मेट्रोशेड प्रकल्प या चर्चेतून मार्गी लागेल, अशी आशा शिवसेनेत निर्माण झाली असून तसे झाल्यास मोदी यांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पास सेना मदत करण्याच्या भूमिकेत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचे शिष्टमंडळ मंगळवारी पंतप्रधान यांना भेटले. या शिष्टमंडळाने तासाभराच्या भेटीत राज्याच्या १२ प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी पंतप्रधान यांच्याकडे केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांमध्ये ३० मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. मोदी यांच्या या ट्रीटमुळे राज्यातील भाजप नेते बुचकळ्यात पडले आहेत. राज्यात नव्या राजकीय समीकरणांचा उदय होईल, असे अंदाज लढवले जात आहेत.

मोदी-ठाकरे भेटीत दोघांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर चर्चा झाल्याचे समजते. उद्धव यांनी आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूर मार्गला स्थलांतरित केला आहे. मात्र त्या जमिनीवर केंद्राने दावा केला असून सध्या हा वाद न्यायालयात आहे. पुढच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका असून मेट्रो प्रकल्प रखडवल्याच्या प्रकरणाचे कोलीत भाजपच्या हाती आले आहे. मेट्रो कारशेडचे स्थलांतर हा ठाकरे यांच्या दीड वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील सर्वात मोठा चुकीच निर्णय म्हटला जातो.

मेट्रो कारशेड प्रकल्प केंद्राने अडवल्याने उद्धव यांनी मोदी यांचा बुलेट ट्रेन प्रकल्प रोखला आहे. बुलेट ट्रेनला मुंबईत कारशेडसाठी वांद्रे येथील बीकेसीची जमिनी दिली जाणार होती. मात्र उद्धव यांनी तो निर्णय प्रलंबित ठेवला असून राज्यातील बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाचे काम रखडले आहे. मोदी-ठाकरे बंदद्वार भेटीत यावर तोडगा काढण्याचे ठरल्याचे समजते. मुळात उद्धव ठाकरे यांचे वैर गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. उद्धव यांनी आजपर्यंत नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका टाळली आहे.

भाजपशी पंगा, मोदींशी संबंध उत्तम उद्धव ठाकरे हे वाटाघाटीत पटाईत मानले जातात. २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना शिवसेनेची मोठी मदत होऊ शकते. उद्धव यांनी भाजपशी पंगा घेतला असला तरी माेदी यांच्याशी संबध उत्तम ठेवले आहेत. त्याचा परिपाक म्हणजे आजची बंदद्वार भेट मानले जाते. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळास पंतप्रधान १० ते १५ मिनिटांत कटवतील, असा भाजप नेत्यांचा मानस होता. घडले मात्र भलतेच. त्यामुळे राज्यात नव्या राजकीय समीकरणांच्या उदयाची चर्चा घडवून आणली जात असल्याचा शिवसेना नेत्यांचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...